पीटीआय, नवी दिल्ली

पाकिस्तानने नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये भारतात होणाऱ्या कनिष्ठ हॉकी विश्वचषकातून माघार घेतली आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) याची माहिती शुक्रवारी दिली. २८ नोव्हेंबर ते २८ डिसेंबरदरम्यान चेन्नई व मदुराई येथे होणाऱ्या स्पर्धेत पाकिस्तानच्या जागी स्थान घेणाऱ्या संघाची घोषणा लवकरच केली जाईल, असे ‘एफआयएच’कडून सांगण्यात आले. ‘‘पाकिस्तान हॉकी महासंघाने आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाला आपला संघ भारतात होणाऱ्या ‘एफआयएच’ कनिष्ठ पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणार नसल्याचे आम्हाला सूचित केले आहे. पाकिस्तानने या स्पर्धेसाठी पात्रता मिळवली होती,’’ असे ‘एफआयएच’ने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

पाकिस्तानला ‘ब’ गटात भारत, चिली आणि स्वित्झर्लंड संघासह स्थान देण्यात आले होते. त्यांच्या जागी कोणत्या संघाला स्थान मिळते हे पाहणे उत्सुकतेचे असेल. भारतात होणाऱ्या दुसऱ्या स्पर्धेत पाकिस्तानने सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी, २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरदरम्यान बिहारच्या राजगीर येथे झालेल्या पुरुषांच्या आशिया चषकातूनही त्यांनी माघार घेतली होती. पहलगाममध्ये २२ एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर दोन्ही देशांचे संबंध प्रभावित झाले. भारत सरकारच्या नवीन नीतिनुसार पाकिस्तानसह द्विपक्षीय मालिकेत खेळणार नाही. मात्र, बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांच्याशी प्रतिस्पर्धा करणे सुरूच ठेवेल. नजीकच्या काळात झालेल्या आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेदरम्यान भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता. पाकिस्तानच्या माघारीबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचे हॉकी इंडियाचे म्हणणे आहे.

पाकिस्तानची तटस्थ स्थानी खेळण्याची इच्छा

‘एफआयएच’ने पाकिस्तानच्या जागी अन्य संघाचा सहभाग करण्याचे म्हटले आहे. मात्र, पाकिस्तान हॉकी महासंघ स्पर्धेचे आयोजन तटस्थ स्थानी झाल्यास सहभागाची इच्छा व्यक्त केली आहे. ‘‘दोन्ही देशांमधील सध्याची स्थिती पाहता कनिष्ठ संघ भारताचा दौरा करणार नाही. याची माहिती ‘एफआयएच’ला देण्यात आली आहे. यासह तटस्थ स्थानाची व्यवस्था झाल्यास आम्हाला कनिष्ठ विश्वचषकात सहभाग नोंदवता येईल, असा आग्रह आम्ही केला आहे. कारण, प्रमुख स्पर्धा या भारतात होत असल्याने आमच्या हॉकीचे नुकसान होत आहे,’’ पाकिस्तान हॉकी महासंघाचे सरचिटणीस राणा मुजाहिद यांनी सांगितले.

पाकिस्तानने स्पर्धेतून माघार घेतल्याची महिती आम्हाला अजून ‘एफआयएच’कडून मिळालेली नाही. मी दीड महिन्यांपूर्वी पाकिस्तान हॉकी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा केली. तेव्हा त्यांनी आपला सहभाग निश्चित केला होता. यानंतर काय झाले याची कल्पना मला नाही. यजमान म्हणून आमचा प्रयत्न सर्वोत्तम स्पर्धेचे आयोजन करणे आहे. आम्हाला विश्वास आहे की, भारत स्पर्धेचे जेतेपद मिळवले. पाकिस्तानच्या जागी अन्य संघाची घोषणा ही ‘एफआयएच’वर अवलंबून आहे.भोलानाथ सिंह, सरचिटणीस, हॉकी इंडिया.