रविवारी भारत आणि पाकिस्तानमध्ये टी-२० विश्वचषकाचा रोमांचक सामना पार पडला. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न स्टेडियममध्ये पार पडलेल्या या सामन्यात भारतानं बाजी मारली. सुरुवातीच्या षटकांमध्ये भारताचे प्रमुख चार खेळाडू बाद झाल्यानंतर पाकिस्तानच सामना जिंकेल अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, भारतीय फलंदाज विराट कोहली आणि हार्दिक पांड्याने संयमी खेळी करत अक्षरश: विजय खेचून आणला आहे. हा सामना भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत क्रिकेटप्रेमींसाठीही प्रतिष्ठेचा सामना होता. दोन्ही देशांच्या क्रिकेट चाहत्यांमध्ये कमालीची खुन्नस पाहायला मिळाली.

अशीच खुन्नस पाकिस्तानी बायको आणि भारतीय नवरा असलेल्या जोडप्यातही पाहायला मिळाली आहे. टीम इंडियाच्या विजयानंतर पाकिस्तानी बायकोनं भारतीय नवऱ्याला दोन दिवसांसाठी ब्लॉक केलं आहे. ज्या दिवशी भारत आणि पाकिस्तानचा सामना असतो, त्यादिवशी या जोडप्यामध्ये अनेकदा खुन्नस पाहायला मिळते, अशी माहिती संबंधित जोडप्याने ‘बीबीसी’ला दिली आहे. कुरअत-उल-ऐन असं पाकिस्तानी पत्नीचं नाव आहे, तर अली इक्बाल असं भारतीय पतीचं नाव आहे. दोघांचा प्रेमविवाह झाला असून दोघंही सध्या ऑस्ट्रेलियात वास्तव्याला आहेत.

ऐन या मुळच्या पाकिस्तानातील कराची येथील रहिवाशी आहेत. तर इक्बाल हे भारतातील लखनऊ येथील रहिवाशी आहेत. दोघांचं एकमेकांवर प्रेम असलं तरी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या दिवशी त्यांच्या घरात तणावपूर्ण स्थिती असते. रविवारी पार पडलेल्या सामन्यात टीम इंडियाचा विजय झाल्यानंतर पाकिस्तानी पत्नी ऐन यांनी भारतीय पती इक्बाल यांना दोन दिवसांसाठी ब्लॉक केलं आहे.

हेही वाचा – IND vs PAK T20 World Cup 2022 : पाकिस्तानच्या पराभवाने बावचळलेल्या शोएब अख्तरचं ट्वीट चर्चेत

यावर प्रतिक्रिया देताना ऐन म्हणाल्या की, “इक्बाल यांना देवानं आनंदी ठेवावं, अशी प्रार्थना मी नेहमी करत असते. पण भारत-पाकिस्तानच्या सामन्यानंतर त्यांना झालेला आनंद मला अजिबात सहन होत नाही.” संबंधित जोडप्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. ते दोघंही भारत-पाकिस्तानमध्ये विभागले आहेत. मुलगा पाकिस्तानला समर्थन देतो, तर मुलगी वडिलांच्या बाजुने भारताला पाठिंबा देते.