हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने वूमन्स वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला. सलामीवीर प्रतिका रावळ या मोहिमेचा अविभाज्य घटक होती. मात्र तिला वर्ल्डकप मेडल मिळणार नाही. काय आहे यामागचं कारण जाणून घेऊया.
वर्ल्डकप संघात प्रतिकाची सलामीवीर म्हणून निवड झाली. डावखुऱ्या प्रतिकाने अनुभवी स्मृती मानधनाला तोलामोलाची साथ देत स्पर्धेत भारताला सातत्याने चांगली सलामी करून दिली. प्रतिकाने ६ डावात ५१.३३च्या सरासरीने ३०८ धावा केल्या. न्यूझीलंडविरुद्धच्या करो या मरो च्या लढतीत प्रतिकाने शतकी खेळी साकारली होती.
बांगलादेशविरुद्धच्या लढतीत क्षेत्ररक्षण करताना प्रतिकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली. तिला सहकाऱ्यांच्या साथीने मैदानाबाहेर नेण्यात आलं. प्रतिकाने उर्वरित डावात क्षेत्ररक्षण केलं नाही. तिचा पायाचा घोटा मुरगाळल्याने ती फलंदाजीलाही येऊ शकली नाही. तिच्याऐवजी अमनजोत कौर सलामीला आली. दुखापत वेळेत बरी होणार नसल्याचं स्पष्ट झालं. सेमी फायनल आणि फायनलमध्ये तिचं नसणं हा भारतीय संघासाठी मोठा धक्का होता.
प्रतिका खेळू शकणार नसल्याने सुरतमध्ये डोमेस्टिक स्पर्धा खेळत असलेल्या शफाली वर्माला तातडीने बोलावण्यात आलं. शफालीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १० धावांची खेळी केली. पण फायनलच्या दडपणाच्या लढतीत शफालीने ८७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. कामचलाऊ गोलंदाजी करणाऱ्या शफालीला गोलंदाजी देण्यात आली. तिने २ विकेट्स पटकावत सामन्याच्या पारडं भारताच्या बाजूने झुकवलं. या अष्टपैलू कामगिरीसाठी शफालीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
भारतीय संघाने ५२ धावांनी सामना जिंकला. सामन्यानंतर जल्लोषावेळी व्हीलचेअरवर बसलेली प्रतिका सहभागी झाली. तिने संघाच्या बरोबरीने आनंद साजरा केला. पुरस्कार वितरण सोहळ्यात १५ खेळाडूंना वर्ल्डकप मेडल देण्यात आलं मात्र प्रतिकाला मेडल मिळालं नाही. आयसीसीच्या नियमानुसार, फायनलवेळी ज्या १५ खेळाडू संघाचा भाग असतात त्यांना मेडल देण्यात येतं. प्रतिका दुखापतग्रस्त झाल्याने तिच्या जागी शफाली वर्माचा समावेश करण्यात आला होता. आयसीसीच्या तांत्रिक समितीने या बदलाला मंजुरी दिली. तांत्रिकदृष्ट्या प्रतिकाचा वर्ल्डकप प्रवास तिथेच संपला.
चाहत्यांनी सोशल मीडियावर या नियमावर टीका केली आहे. प्रतिकाने भारताला वर्ल्डकप जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. ती मेडलची हकदार आहे. तिलाही मेडल मिळायला हवी अशी आग्रही मागणी चाहत्यांनी केली. मात्र हे शक्य नाहीये.
स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत स्मृती मानधना दुसऱ्या तर प्रतिका चौथ्या स्थानी आहे. गुवाहाटी इथे झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या लढतीत प्रतिकाने ३७ धावा केल्या. पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध तिने ३१ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३७ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिने ७५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. इंग्लंडविरुद्ध ६ धावा करून ती तंबूत परतली. डी वाय पाटील स्टेडियमवर झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत प्रतिकाने १२२ धावांची दिमाखदार खेळी केली.
