Pratika Rawal Will Receive World Cup Winning Medal: आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत जेतेपदाचा मान मिळवला. भारताने पहिल्यांदाच वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली. या विजयात प्रतिका रावळनेही मोलाचं योगदान दिलं होतं. पण दुखापतीमुळे संघाबाहेर झाल्यामुळे तिला विनिंग मेडल दिलं गेलं नव्हतं. भारतीय खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला गेले होते. त्यावेळी फोटोशूटदरम्यान अमनजोत कौरने आपलं मेडल प्रतिका रावळला दिलं होतं. पण आता बीसीसीआय अध्यक्ष जय शाह यांनी हस्तक्षेप केल्यानंतर प्रतिका रावळला आपल्या हक्काचं मेडल मिळणार आहे.
नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून जेतेपदाचा मान मिळवला होता. याआधी झालेल्या सेमीफायनलच्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. या सामन्यात शफाली वर्माचा मुख्य संघात समावेश करण्यात आला होता. कारण बांगलादेशविरूद्ध झालेल्या साखळी फेरीतील शेवटच्या सामना बांगलादेशविरूद्ध पार पडला होता. या सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना प्रतिका रावळच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे तिला संघाबाहेर व्हावं लागलं होतं. अंतिम १५ संघाचा भाग नसल्यामुळे ती विनिंग मेडलसाठी पात्र ठरली नव्हती.
प्रतिका रावळला विनिंग मेडल न दिल्यामुळे क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे नाराजी व्यक्त केली होती. चाहत्यांच्या मागणीनंतर अखेर बीसीसीआय अध्यक्ष जय शाह यांनी पुढाकार घेतला आहे. मेडल मिळवून देण्यासाठी जय शाह यांनी हस्तक्षेप केला असल्याची माहिती प्रतिका रावळने माध्यमांशी बोलताना दिली आहे. प्रतिकाने माध्यमांशी बोलताना सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीदरम्यान मी जे मेडल घातले होते, ते सपोर्ट स्टाफमधील एका सदस्याने तात्पुरते दिले होते. पण यापुढे माझ्याकडे स्वत:चे हक्काचे मेडल असणार आहे. आयसीसीसचे अध्यक्ष जय शाह मला हे मेडल मिळवून देणार आहेत. यासाठी ते आयसीसीच्या नियमात बदल करण्यासाठी प्रतत्नशील आहेत. याबाबत त्यांनी संघ व्यवस्थापकांना कळवलं आहे.”
प्रतिका रावळची दमदार कामगिरी
या स्पर्धेतील साखळी फेरीतील सामन्यांमध्ये प्रतिका रावळच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला होता. ३०० हून अधिक धावा करून ती या स्पर्धेत भारतीय संघाकडून दुसरी सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली होती. तर संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ती चौथ्या स्थानी राहिली. पण महत्वाच्या सामन्याआधी तिला संघाबाहेर व्हावं लागलं होतं. पण जय शाह यांच्या प्रयत्नांनंतर अखेर तिला हक्काचं मेडल मिळणार आहे.
