Prithvi Shaw smashes hundred in debut innings for Maharashtra: बूची बाबू स्पर्धेत पृथ्वी शॉ ची बॅट चांगलीच तळपली आहे. पृथ्वीने महाराष्ट्रकडून पदार्पणाच्या सामन्यातच शतक झळकावलं आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पृथ्वी शॉच्या स्फोटक खेळीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. देशांतर्गत क्रिकेटमध्ये पृथ्वी शॉने मुंबई संघाची साथ सोडून महाराष्ट्र संघात सामील झाला आणि पदार्पणाच्या सामन्यात त्याने आपली चमक दाखवून दिली.

जगातील सर्वाेत्कृष्ट तरूण खेळाडूंपैकी मानला गेलेला पृथ्वी शॉच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला दणक्यात सुरूवात झाली खरी, पण काहीशी अपूर्ण राहिली. पृथ्वीने भारताकडून फक्त ५ कसोटी सामने, ६ एकदिवसीय सामने आणि १ टी-२० सामना खेळला. भारतासाठी त्याचा शेवटचा सामना जुलै २०२१ मध्ये त्याने खेळला. त्यानंतरही दोन वर्षे त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली, पण मागच्या हंगामात त्याच्या कामगिरीत मोठी घसरण दिसून आली.

पृथ्वी शॉचं पदार्पणाच्या सामन्यात वादळी शतक

पृथ्वी शॉने आता संधी मिळताच महाराष्ट्रकडून पदार्पणाच्या सामन्यातच शतक झळकावलं आहे. पृथ्वी शॉने १२२ चेंडूत १४ चौकार आणि १ षटकार लगावत शतक झळकावलं. कर्णधार अंकित बावणे आणि ऋतुराज गायकवाड सारखे खेळाडू अपयशी ठरले.

पृथ्वी शॉने आतापर्यंत ५८ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ४५५६ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ४६.०२ असून त्याने १३ शतकं आणि १८ अर्धशतकं झळकावली आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या ३७९ धावा इतकी आहे. लिस्ट-ए सामन्यांत शॉने ३३९९ धावा केल्या असून त्याची सरासरी ५५.७२ आणि स्ट्राईक रेट १२५.७४ आहे. टी-२० क्रिकेटमध्ये त्याने २९०२ धावा केल्या आहेत, सरासरी २५.०१ आणि स्ट्राईक रेट १५१.५४ इतका आहे. आयपीएल २०२५च्या महालिलावात मात्र त्याला कोणत्याही संघाने खरेदी केलं नाही. २०१८ मध्ये भारताने जिंकलेल्या अंडर-१९ विश्वचषक संघाचा शॉ हा कर्णधार होता, तर सध्याचा कसोटी कर्णधार शुबमन गिल त्या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला होता.

महाराष्ट्रा संघाने चांगली सुरुवात केल्यानंतर सलग ४ विकेट्स गमावल्या. पृथ्वी शॉने सचिन दाससह पहिल्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली. सचिन १० धावा करून बाद झाला. पहिली विकेट गमावल्यानंतर, १५ धावांच्या आत संघाने ३ विकेट्स गमावल्या. महाराष्ट्राची धावसंख्या १ बाद ७१ वरून ४ बाद ८५ अशी झाली. पृथ्वीने एक टोक सांभाळून ठेवत उत्कृष्ट फटकेबाजी केली. त्याने सिद्धार्थ म्हात्रेसह संघाची धावसंख्या १५० च्या जवळ नेली आहे.

त्यानंतर सचिन धसच्या १० धावा, सिद्धेश वीर ४ धावा, ऋतुराज गायकवाडच्या १ धावा आणि अंकित बावणे २१ धावा करत झटपट बाद झाले. अंकितने पृथ्वीसह ५७ धावांची भागीदारी केली. यासह महाराष्ट्र आता छत्तीसगढपेक्षा १०९ धावांनी मागे आहेत. छत्तीसगढकडून वरुण सिंग भुईने ३ विकेट घेतल्या. शशांक तिवारी आणि ऋषी शर्मा यांनी १-१ विकेट घेतले.

सर्फराझ खानने पहिल्या दिवशीचं झळकावलं शतक

सोमवारी (१८ ऑगस्ट) बुची बाबू स्पर्धेतील टीएनसीए इलेव्हन विरुद्धच्या पहिल्या सामन्यात मुंबईकडून सर्फराझ खानने शतक झळकावलं. भारतासाठी ६ कसोटी सामने खेळणाऱ्या सर्फराझला इंग्लंडविरूद्ध मालिकेतून वगळण्यात आलं होतं. यानंतर संधी मिळताच त्याने शानदार कामगिरी केली आहे.