Greg Chappell on Vaibhav Suryavanshi: राजस्थान रॉयल्सच्या वैभव सुर्यवंशीने ३५ चेंडूत शतक ठोकून पुन्हा एकदा दाखवून दिले की, क्रिकेटच्या जगतात वय ही फक्त एक संख्या आहे. जर तुमच्यात प्रतिभा असेल तर कुणीही तुम्हाला थांबवू शकत नाही. आतापर्यंत प्रत्येक पिढीत क्रिकेटमध्ये नवे नवे स्टार खेळाडू पाहायला मिळाले आहेत. आयपीएल सुरू झाल्यापासून अनेक क्रिकेटपटूंच्या प्रतिभेला वाव मिळाला. १४ वर्षीय वैभव सुर्यवंशीने वेगवान शतक ठोकून क्रिकेट जगताला अचंबित केले. वैभवच्या खेळीनंतर त्याचे चहुबाजूंनी कौतुक होत असताना भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांनी मात्र एक गंभीर मुद्दा बीसीसीआयकडे मांडला आहे.
वैभव सुर्यवंशीला हाताळण्याबाबत ग्रेग चॅपेल यांनी बीसीसीआयला सावधगिरीचा इशारा दिला आहे. भारतीय क्रिकेटने सचिन तेंडुलकर सारख्या खेळाडूंचा बालपणापासूनचा प्रवास पाहिला आहे. तो एक महान खेळाडू झाला. पण त्याचबरोबर प्रतिभा असूनही विनोद कांबळी आणि पृथ्वी शॉ यांचेही अपयश पाहिले.
इएसपीएन क्रिकइन्फो या संकेतस्थळावर लिहिलेल्या लेखात ग्रेग चॅपेल म्हणाले, “सचिन तेंडुलकर लहानपणी फक्त त्याच्या प्रतिभेमुळे यशस्वी झाला असे नाही. त्याच्यामागे चांगले वातावरण, कुशल प्रशिक्षक आणि बाहेरच्या जगातील सर्कसपासून त्याच्या कुटुंबियांनी त्याचे केलेले संरक्षण या भक्कम आधारामुळे तो यशस्वी झाला. दुसरीकडे, तितकाच प्रतिभावान असेलला कदाचित अधिक उजवा असलेला विनोद कांबळी प्रसिद्धी आणि स्वयंशिस्त यांच्यात संतुलन राखण्यासाठी संघर्ष करत होता. त्याचे पतन त्याच्या उदयाइतकेच नाट्यमय होते.”
“पृथ्वी शॉ बरोबरही अशाच प्रकारचे गटांगळ्या खात आहे. पण त्याला पुन्हा प्रवाहात येण्याची संधी आहे”, असे चॅपेल यांनी लेखात लिहिले.
कांबळी आणि तेंडुलकर यांनी लहानपणी एकत्र क्रिकेट खेळले. ते भारतीय संघातही होते. डावखुरा फलंदाज असेलला कांबळी काही काळाने पडद्याआड गेला तर सचिन तेंडुलकरने आपल्या खेळाने नवा इतिहास घडवला. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय (कसोटी, एकदिवसीय, टी२०) कारकिर्दीत ३४,३५७ धावा केल्या. तेंडुलकरने कसोटीत १५,९२१ आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये १८,४२६ धावा केल्या.
दुसरीकडे कांबळीला फक्त १७ कसोटी आणि १०४ एकदिवसीय सामने खेळता आले. त्याने कसोटी सामन्यात दोन वेळा द्वीशतक ठोकण्याचा विक्रम केला होता. मुंबईच्या वानखेडे स्टेडीयममध्ये इंग्लंड विरोधात २२४ आणि दिल्ली येथे झिम्बॉम्बे विरोधात २२४ धावा केल्या होत्या. मात्र खेळात सातत्य नसल्यामुळे त्याला भारतीय संघात अधिक काळ टिकता आले नाही. मैदानाबाहेरही त्याला वैयक्तिक गोष्टी नियंत्रित करता आल्या नाहीत. मद्याचे व्यसन लागल्यामुळे त्याला आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागले.
पृथ्वी शॉ हा बाल खेळाडू म्हणून नावारुपाला आला. २०१८ मध्ये त्याने भारताला १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकून दिला. परंतु सध्या तो मुख्य भारतीय संघात किंवा आयपीएलमध्येही नाही. पृथ्वी शॉच्या नेतृत्वात खेळणारे शुबमन गिल आणि अर्शदीप सिंग आज मोठे नाव कमावत आहेत. वेस्ट इंडिजविरोधात पृथ्वीने पदार्पणातच शतक झळकावले होते. त्याच्याकडे भारतीय क्रिकेटचे भविष्य म्हणून पाहिले जात असातना तो अचानक बाहेर गेला. बेशिस्त, प्रकृतीकडे दुर्लक्ष आणि मैदानाबाहेर नको त्या वादात अडकल्यामुळे त्याच्या कारकिर्दीवर परिणाम झाला.
कांबळी आणि पृथ्वी शॉचे उदाहरण देऊन ग्रेग चॅपेल यांनी वैभव सुर्यवंशीला कशाप्रकारे हाताळता येईल, याबद्दल बीसीसीआयला आवाहन केले आहे. त्याच्या प्रतिभेला आणखी वाव मिळेल आणि तो एक चांगला खेळाडू म्हणून पुढे येईल, यासाठी प्रयत्न करावेत, असेही चॅपेल म्हणाले आहेत.