पीटीआय, मुंबई

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहित शर्माला शतकांची कला अवगत आहे. चांगल्या सुरुवातीचे मोठय़ा खेळीत रूपांतर कसे करायचे हे त्याला कोणीही शिकवण्याची गरज नाही, असे वक्तव्य भारताचा अनुभवी ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनने केले.भारताचा कर्णधार रोहितने नुकत्याच झालेल्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आक्रमक शैलीत फलंदाजी केली. त्याने पहिल्या चेंडूपासून फटके मारण्याचा प्रयत्न करताना प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर दडपण आणले. त्याने या स्पर्धेच्या ११ सामन्यांत १२५च्या स्ट्राईक रेटने ५९७ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यातही रोहितने अप्रतिम सुरुवात करताना ३१ चेंडूंत ४७ धावा फटकावल्या. मात्र, फिरकी गोलंदाज ग्लेन मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर एकेक चौकार आणि षटकार मारल्यानंतर पुन्हा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. त्यामुळे रोहितवर बरीच टीका झाली. रोहित बाद झाल्यानंतर भारताच्या धावांची गती मंदावली आणि अखेर ऑस्ट्रेलियाने सहज आव्हान पार करताना विश्वचषक जिंकला.

‘‘रोहितने आणखी काही वेळ खेळपट्टीवर टिकण्याचा प्रयत्न केला असता, तर त्याने शतक झळकावले असते असे म्हटले जात आहे. मात्र, आपण आक्रमक शैलीत खेळत राहणार हे रोहितने निश्चित केले होते. त्याने अन्य खेळाडूंसमोर उदाहरण ठेवल्याने संघ म्हणून आमची खेळण्याची शैली बदलली. शतके कशी करायची हे रोहित शर्माला शिकवण्याची गरज नाही. त्याने आपल्या कारकीर्दीत बरीच शतके केली आहेत. या स्पर्धेत तो ज्या शैलीत आणि ज्या हेतूने फलंदाजी करत होता, ते अत्यंत महत्त्वाचे होते,’’ असे अश्विन म्हणाला.

हेही वाचा >>>Ind vs Aus: प्रेक्षकांचा प्रतिसाद न झेपल्यानं जिओ सिनेमा क्रॅश

ऑस्ट्रेलियाच्या निर्णयाचा धक्का

अहमदाबाद येथे झालेल्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा ऑस्ट्रेलियाने घेतलेला निर्णय आपल्यासाठी धक्कादायक होता, असे अश्विन म्हणाला. ‘‘अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने सर्वच गोष्टी उत्कृष्ट केल्या. त्यांचा इतिहास पाहता अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर ते प्रथम फलंदाजी करतील अशी मला अपेक्षा होती. अहमदाबाद येथील माती ही ओडिशाप्रमाणे आहे, हे अनेकांना ठाऊक नाही. या मातीने बनवलेल्या खेळपट्टीला फारशा भेगा पडत नसल्या, तरी चेंडू फार उसळी घेत नाही. अंतिम सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी झाल्यानंतर मी खेळपट्टीवर नजर टाकली. तसेच माझी ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली यांच्याशी भेट झाली. ‘तुम्ही प्रथम गोलंदाजी का निवडली,’ असे मी त्यांना विचारले. यावर त्यांनी उत्तर दिले की, ‘आम्ही इथे ‘आयपीएल’ आणि द्विदेशीय मालिकांचे बरेच सामने खेळले आहेत. लाल मातीने बनवलेल्या खेळपट्टीला भेगा पडतात. परंतु काळय़ा मातीने बनवलेल्या खेळपट्टीवर प्रकाशझोतात फलंदाजी सोपी होते.’ त्यांचे उत्तर ऐकून मला धक्काच बसला. भारत हे जागतिक क्रिकेटचे प्रमुख केंद्र बनले असून अन्य संघांना ‘आयपीएल’ आणि द्विदेशीय मालिकांतील अनुभव फायदेशीर ठरत आहे. भारतातील खेळपट्टय़ांचा ते अगदी योग्य अंदाज बांधत आहेत,’’ असे अश्विनने नमूद केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: R ashwin opinion on rohit sharma style of play in the world cup is right amy