अवघ्या जगभरातील क्रिकेटरसिकांचा आवडता खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर आज ५० वर्षांचा झाला. त्याच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त फक्त मुंबईच नाही, महाराष्ट्रच नाही, भारतच नाही तर जगभरातल्या क्रिकेट चाहत्यांकडून त्याला वेगवेगळ्या भेटवस्तू दिल्या जात आहेत. त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. प्रत्येकजण आपल्या परीने आपल्या लाडक्या ‘तेंडल्या’ला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील त्यांच्या लाडक्या मित्राला खास शुभेच्छा दिल्या आहेत.

राज ठाकरे हे क्रिकेटप्रेमी आणि सचिनप्रेमी आहेत. त्यांनी त्यांचं हे प्रेम वेळोवेळी व्यक्त केलं आहे. आज सचिनच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या सचिनबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. राज ठाकरे यांनी सचिनसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच फोटोसोबत कॅप्शनमध्ये त्यांनी सचिनला शुभेच्छा दिल्या तसेस पन्नाशीनंतर आता शतक पूर्ण करावं ही इच्छादेखील व्यक्त केली.

हे ही वाचा >> “आता स्फोट होऊ शकतो”, उद्धव ठाकरेंच्या नरेंद्र मोदींवरील ‘त्या’ टीकेनंतर भाजपा संतप्त, बावनकुळे म्हणाले, “असंतोष भडकणार”

राज यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिलं आह की, सचिन तेंडुलकरने आज अवघी पन्नाशी पूर्ण केली. या अवाढव्य देशाच्या हृदयाचे ठोके एकाच क्षणाला थांबवायची किंवा एकत्र आख्ख्या देशाने ज्याच्यावर जीव ओवाळून टाकावा, अशी ताकद ज्या माणसाने निर्माण केली तो आपला सचिन. आकाशाला गवसणी घालणारं अफाट असं यश मिळवून देखील जमिनीवर घट्ट पाय ठेवणाऱ्या माझ्या मित्राला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. सचिनने शतक ठोकलंच पाहिजे अशी कायमच इच्छा किंवा अपेक्षा असते, ही इच्छा/अपेक्षा सचिन तू पूर्ण करशीलच.