छत्तीसगढमधील गावात एक अनोखी घटना घडली आहे. या गावातील एक मुलगा त्याच्या दुकानात बसला होता आणि अचानक त्याचा फोन वाजला आणि समोरून आवाज आला, हॅलो मी विराट कोहली बोलतोय. थोड्यावेळाने अजून एक कॉल आणि समोर म्हटलं गेलं मी एबी डिविलियर्स बोलतोय, काही वेळाने तिसरा कॉल आला आणि म्हटलं गेलं मी रजत पाटीदार बोलतोय. एखाद्या चित्रपटातील कथेसारखा वाटणारा हा प्रसंग या मुलासमोर कसा घडला, जाणून घेऊया.

छत्तीसगढच्या गारियाबाद जिल्ह्यातील मडगांव देवभोग येथील मुलाबरोबर चित्रपटात एखादा स्वप्नवत किस्सा घडतो, तसंच काहीसं घडलं. मनिष बीसी आणि खेमराज या दोन मित्रांना रजत पाटीदारचा जुना फोन नंबर अलॉट करण्यात आला.

२८ जूनला मनिषने रिलायन्स जिओचं नवं सिम कार्ड खरेदी केलं. नवं सिम कार्ड घेतल्यानंतर त्याने सर्व प्रक्रिया पूर्ण केली आणि व्हॉट्सएप डाऊनलोड केलं. त्यानंतर व्हॉट्सएपवर पाहतो तर काय रजत पाटीदारचा प्रोफाईल फोटो होता. त्यांना सुरूवातीला वाटलं की काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम असावा.

नवीन सिम कार्ड अन् आले विराट-डिविलियर्सचे कॉल

यानंतर नवीन नंबरवर कॉल यायला सुरूवात झाली. पण हे कॉल मोठ्या क्रिकेटपटूंचे आणि त्यांच्यासंबंधित व्यक्तींचे होते. एकाने कॉलवर विराट कोहली असल्याचं म्हटलं तर एक जण एबी डिविलियर्स असल्याचं म्हणाला. या दोन्ही मित्रांना सुरूवातीला कोणीतरी मस्करी करतंय वाटतं होतं त्यामुळे त्यांनी स्वत: एम एस धोनी असल्याचं सांगितलं.

१५ जुलैला मनिषला अजून एका नंबरवरून कॉल आला आणि तितक्यात कॉल करणाऱ्या व्यक्तीने म्हटलं, “मी रजत पाटीदार बोलतोय, हा माझा नंबर आहे; प्लीज मला परत करा.” यावर मनिष आणि त्याच्या मित्राला मस्करी सुरू असल्याचं वाटलं आणि ते म्हणाले ‘हो आम्ही एम एस धोनी बोलतोय.’

रजतने शांतपणे त्यांना समजावलं की हा माझा जुना नंबर आहे आणि तो महत्त्वाचा आहे. मला माझे मित्र, कोच आणि क्रिकेटपटूंना कॉल करण्यासाठी महत्त्वाचा आहे. पण समोरून मस्करी सुरू असल्याने तो म्हणाला, ठिके मी पोलिसांना पाठवतो. रजतने कॉल ठेवल्यानंतर १० मिनिटांत पोलिस दाखल झाले. त्यानंतर दोघेही मित्र थबकले आणि त्यांना कळलं की आपण खरंच रजत पाटीदारशी बोलत होतो. त्या मुलांनी लगेच सिम कार्ड परत दिलं.

विराट कोहलीचा मोठा चाहता असलेल्या खेमराजने म्हटलं, मला चुकीच्या नंबरमुळे विराट कोहलीशी बोलण्याची संधी मिळाली. माझं स्वप्न पूर्ण झालं. तांत्रिक कारणांमुळे, रजत पाटीदारचा नंबर ९० दिवसांसाठी बंद होता आणि नियमांनुसार, नवीन ग्राहक बंद नंबर घेऊ शकतो. यामुळेच हा नंबर मनीषला देण्यात आला होता, त्यामुळे संपूर्ण घटना घडली.