भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणे सध्या सुरु असलेल्या रणजी करंडक स्पर्धेत मुंबईकडून काही सामने खेळणार आहे. ओडीशाविरुद्ध भुवनेश्वरयेथे १ ते ४ नोव्हेंबरदरम्यान मुंबईचा सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी अजिंक्य रहाणेची मुंबईच्या संघात निवड करण्यात आलेली आहे. याचसोबत गोलंदाजीची बाजू बळकट करण्यासाठी मुंबईचा हक्काचा गोलंदाज शार्दुल ठाकूरचीही संघात निवड करण्यात आलेली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर सध्या न्यूझीलंडविरुद्ध सुरु असलेल्या वन-डे मालिकेत भारतीय संघाचा भाग आहेत. मात्र मुंबई आणि पुण्यात झालेल्या सामन्यांमध्ये या दोन्ही खेळाडूंना त्यांना संधी मिळालेली नाही. याचसोबत आगामी टी-२० मालिकेसाठी या दोन्ही खेळाडूंची संघात निवड करण्यात आलेली नसल्याने या दोन्ही खेळाडूंचा मुंबईच्या रणजी संघात समावेश करण्यात आलेला आहे.

रणजी स्पर्धेत मुंबईच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी आपण उपलब्ध नसल्याचं अजिंक्य रहाणेने मुंबईच्या निवड समितीला कळवलं होतं. अजिंक्यच्या या वागणुकीमुळे निवड समितीचे सदस्य नाराजही झाले होते. मात्र आता आगामी ओडीशाविरुद्धच्या सामन्यासाठी अजिंक्य रहाणेची संघात निवड करण्यात आलेली आहे. ओडीशाविरुद्ध सामन्यासाठी असा असेल मुंबईचा रणजी संघ –

आदित्य तरे (कर्णधार), सुर्यकुमार यादव (उप-कर्णधार), अखिल हेरवाडकर, पृथ्वी शॉ, जय बिस्ता, अजिंक्य रहाणे, सिद्धेश लाड, अभिषेक नायर, विजय गोहील, धवल कुलकर्णी, आकाश पारकर, रोस्टन डायस, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, आदित्य धुमाळ आणि सुफीयान शेख (राखीव यष्टीरक्षक)

सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार ओडीशाविरुद्धच्या सामन्यानंतर बडोद्याविरुद्धच्या सामन्यासाठीही अजिंक्य रहाणे मुंबई संघासाठी उपलब्ध असणार आहे. यानंतर श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर असल्यामुळे कसोटी मालिकेसाठी अजिंक्य रहाणेला भारतीय संघासोबत जावं लागणार आहे. या हंगामातील मुंबईचे पहिले दोनही सामने अनिर्णित राहिल्यामुळे त्यांना गुणतालिकेत चांगली कामगिरी करता आलेली नाहीये. त्यामुळे अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूरच्या येण्याने मुंबईचा संघ बडोद्यासमोर चांगलं आव्हान उभं करु शकेल असा अंदाज क्रिकेट समीक्षकांनी व्यक्त केला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranji trophy season 2017 18 ajinkya rahane and shardul thakur to include in mumbai ranji trophy squad against odisha