Ravindra Jadeja Wicket: मँचेस्टरच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याचा थरार सुरू आहे. पहिल्या दिवशी भारतीय संघाला ४ गडी बाद २६४ धावा करता आल्या होत्या. दुसऱ्या दिवशी रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूरची जोडी मैदानावर आली. मात्र, या जोडीला हवी तशी सुरूवात करून देता आलेली नाही. तुफान फॉर्ममध्ये असलेला रवींद्र जडेजा स्वस्तात माघारी परतला.
भारतीय संघातील सातत्याने चांगली कामगिरी करणारा फलंदाज जर कोणी असेल तर तो रवींद्र जडेजा आहे. एजबस्टन आणि लॉर्ड्स कसोटी सामन्यातील दोन्ही डावात त्याने दमदार अर्धशतकं झळकावली. या सामन्यात फलंदाजी करताना त्याला चांगली सुरूवात मिळाली होती. पण, जोफ्रा आर्चरने त्याच्या खेळावर पूर्णविराम लावला. रवींद्र जडेजा ४० चेंडूंचा सामना करून २० धावा करत माघारी परतला.
तर झाले असे की, दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर भारतीय संघाकडून रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूरची जोडी मैदानावर आली. इंग्लंडकडून ख्रिस वोक्स पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला. त्यानंतर जोफ्रा आर्चर दुसरे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला. जोफ्रा आर्चरच्या ८५ व्या षटकातील पाचवा चेंडू टप्पा पडून बाहेर गेला. हा चेंडू जडेजाने डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटची कडा घेऊन दुसऱ्या स्लीपमध्ये असलेल्या हॅरी ब्रुकच्या हातात गेला. हॅरी ब्रुकने कुठलीही चूक न करता डाईव्ह मारत सोपा झेल घेतला.
पहिल्या दिवशी काय घडलं?
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून केएल राहुल आणि यशस्वी जैस्वालची जोडी मैदानावर आली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ९४ धावा जोडल्या. केएल राहुल ४६ धावांवर तंबूत परतला. तर जैस्वालने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्याने ५८ धावांची खेळी केली. कर्णधार शुबमन गिल १२ धावांवर बाद झाला. साई सुदर्शनने ६१ धावा केल्या. तर रवींद्र जडेजा १९ आणि शार्दुल ठाकूर १९ धावांवर नाबाद परतले. भारतीय संघाची चिंता वाढवणारी बातमी म्हणजे ऋषभ पंत दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे पुढील ६ आठवडे त्याला विश्रांती करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे तो पुन्हा फलंदाजीला येऊ शकणार नाही.