Ravindra Jadeja: लॉर्ड्सच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये तिसऱ्या कसोटी सामन्याचा थरार सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना इंग्लंडला ३८७ धावा करता आल्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून केएल राहुलने दमदार शतकी खेळी केली. तर रवींद्र जडेजालाही आपलं शतक पूर्ण करण्याची संधी होती. पण ख्रिस वोक्सने त्याला ७२ धावांवर बाद करत माघारी धाडलं. त्याला बाद करण्यासाठी जेमी स्मिथने उजव्या बाजूला डाईव्ह मारत भन्नाट झेल घेतला.

भारतीय संघ जेव्हा जेव्हा अडचणीत असतो, तेव्हा रवींद्र जडेजा खंबीरपणे उभा राहतो. एजबस्टन कसोटीतील त्याने दोन्ही डावात दमदार अर्धशतकं झळकावली होती. पहिल्या डावात त्याने ८९ तर दुसऱ्या डावात नाबाद ६९ धावांची खेळी केली होती. आता लॉर्ड्सच्या मैदानावर त्याने ७२ धावा केल्या आहेत. जडेजाला आपलं शतक पूर्ण करण्यासाठी अवघ्या २८ धावांची गरज होती. मात्र, जडेजाचं हे अर्धशतक खूप खास आहे. कारण, सुरूवातीला मोठे धक्के बसल्यानंतर त्याने नितीश कुमार रेड्डीसोबत मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरसोबत मिळूनही त्याने भारताचा डाव सावरला. या भागीदारीच्या बळावर त्याने भारतीय संघाची धावसंख्या ३५० पार पोहोचवली.

तर झाले असे की, भारतीय संघाची फलंदाजी सुरू असताना इंग्लंडकडून ख्रिस वोक्स ११४ वे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला. या षटकातील दुसरा चेंडू वोक्सने लेग साईडच्या बाहेर टाकला. हा चेंडू जडेजाने सोडायला हवा होता. पण त्याने फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटची कडा घेत यष्टीरक्षक जेमी स्मिथच्या हातात गेला. त्याने कुठलीही चूक न करता उजव्या दिशेने डाईव्ह मारली आणि शानदार झेल घेतला. त्यामुळे जडेजाचा डाव ७२ धावांवर आटोपला.

भारतीय संघाचा पहिला डाव

या सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडने ३८७ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून सलामीवीर केएल राहुलने आपलं शतक पूर्ण केलं. यशस्वी जैस्वालने १३, करूण नायरने ४०, कर्णधार शुबमन गिलने १६, ऋषभ पंतने ७४, रवींद्र जडेजाने ७२, नितीश कुमार रेड्डीने ३०, आकाश दीपने ७ धावांची खेळी केली. भारतीय संघाचा पहिला डाव ३८७ धावांवर आटोपला आहे.