RBI congratulates Indian Women Cricket Team: भारतीय महिला क्रिकेट संघाने २ नोव्हेंबर रोजी नवी मुंबईतील डी. वाय. पाटील क्रिकेट स्टेडियमवर एकदिवसीय विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत पहिल्यांदाच जगजेत्तेपद मिळवले. या सामन्यात सलामी फलंदाज शफाली वर्माने अष्टपैलू कामगिरी करत आणि फिरकीपटू दिप्ती शर्माने ५ बळी घेत भारताच्या विजयाचा मार्ग सुकर केला. भारताच्या या विजयानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक्सवर एका पोस्टच्या माध्यमातून भारतीय महिला संघ आणि आरबीआयची अधिकारी सलामी फलंदाज स्मृती मानधनाचे अभिनंदन केले आहे.
एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की, “भारतीय महिला क्रिकेट संघाचे त्यांच्या ऐतिहासिक विश्वचषक विजयाबद्दल हार्दिक अभिनंदन! या विजयात उत्कृष्ट भूमिका बजावल्याबद्दल संघ सदस्य आणि आरबीआय अधिकारी स्मृती मानधनाचे विशेष अभिनंदन. पुढील काळातही भारतीय संघाला असेच यश मिळो ही आरबीआयची सदिच्छा आहे.”
स्मृती मानधनाची अंतिम सामन्यातील कामगिरी
अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला चांगल्या सुरूवातीची गरज होती. भारतीय संघाकडून डावाची सुरूवात करताना स्मृती आणि शफालीने मिळून शतकी भागीदारी केली. स्मृतीने ५८ चेंडूंचा सामना करत ४५ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान तिने ८ चौकार मारले. तिचे अर्धशतक थोडक्यात हुकले. पण भारताला अंतिम सामन्यात जशी सुरूवात हवी होती, तशी सुरूवात मिळाली.
सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसऱ्या स्थानी
भारतात पार पडलेल्या या महिला एकदिवसीय विश्वचषकात स्मृती मानधना सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिली. या स्पर्धेत स्मृती भारताकडून सर्वाधिक धावा करणारी फलंदाज होती. स्मृती मानधनाने स्पर्धेतील नऊ सामन्यांमध्ये ५४.२५ च्या सरासरीने ४३४ धावा केल्या. स्मृतीने या विश्वचषकात एक शतक आणि दोन अर्धशतकेही झळकावली.
भारताच्या अंतिम सामन्यातील विजयानंतर स्मृती मानधना म्हणाली होती की, “मला अजूनही कळत नाही, काय बोलू, काय प्रतिक्रिया देऊ. मी मैदानावर कधी भावुक होत नाही, पण हा कमालीचा क्षण आहे. प्रत्येक विश्वचषकांमध्ये आतापर्यंत अनेकदा निराशा पदरी पडली आहे. प्रत्येक वेळी मने दुखावली. पण तरीही एक गोष्ट ठाम होती, आपली जबाबदारी फक्त जिंकण्यापुरती नव्हती, तर महिला क्रिकेटचा पाया अधिक मजबूत करण्याची होती. आणि खरेच सांगायचे, गेल्या दीड महिन्यात मिळालेल्या लोकांचा पाठिंबा अविश्वसनीय होता.”
