रॉयल चॅलेजंर्स बंगळुरू संघासाठी हे वर्ष वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हतं. गेल्या १८ वर्षांपासून हा संघ जेतेपदासाठी प्रयत्न करत होता. पण आयपीएलची ट्ऱॉफी काही हाती लागत नव्हती. यावर्षी रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली खेळताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने जेतेपदाची ट्रॉफी उंचावली. पण विजयाचा जल्लोष करत असताना ४ जूनला बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये धक्कादायक घटना घडली. स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ लोकांना आपला जीव गमवावा लागला, तर ७५ हून अधिक लोकं दुखापतग्रस्त झाली. या धक्कादायक घटनेनंतर वातावरण चांगलच तापलं होतं. त्यामुळे रॉयस चॅलेंजर्स बंगळुरू संघावरही जोरदार आरोप केले गेले होते.
या घटनेनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पीडितांच्या कुटुंबियांना १० लाख रूपयांची मदत देखील जाहीर करण्यात आली होती. आता ८४ दिवसांनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पहिल्यांदाच पोस्ट शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं,” शांतता ही आमची अनुपस्थिती नव्हती. हे दु:ख होतं. हे ठिकाण एकेकाळी ऊर्जा, आठवणी आणि त्यांच्या आनंदी क्षणांनी भरलेलं होतं. पण ४ जूनला सर्व काही बदललं. त्या दिवशी आमचं मन तुटलं आणि त्यानंतरची शांतता हीच आमचं दु:ख व्यक्त करण्याची पद्धत ठरली.”
तसेच त्यांनी पुढे लिहिले की, “या शांततेत आम्ही शोक करत होतो,ऐकत होतो आणि शिकत होतो. आम्ही हळूहळू असं काहीतरी घडवू लागलो, चे खरंच अर्थपूर्ण आहे. असं करत असतानाच RCB CARES जन्माला आलं.
हा उपक्रम आमच्या चाहत्यांचा सन्मान करण्यासाठी, त्यांना बरे वाटण्यासाठी आणि त्यांच्या सोबत खंबीरपणे उभं राहण्यासाठी सुरु झाला.”
आरसीबी केअर्सबद्दल सांगताना त्यांनी लिहिले,” आज आम्ही पुन्हा या जागी आलो आहोत, उत्सव साजरा करण्यासाठी नाही तर काळजी घेण्यासाठी.तुमच्यासोबत उभं राहण्यासाठी.एकत्र पुढे जाण्यासाठी आणि कर्नाटकमध्ये अभिमानाने उभं राहणं सुरू ठेवण्यासाठी.”
आयपीएल २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्ज संघाला विजयासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. पण पहिल्या डावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली आणि त्यानंतर दुसऱ्या डावात गोलंदाजांनी धावांचा यशस्वी बचाव करत संघाला विजय मिळवून दिला.