Virat Kohli On RCB Victory Parade Bengaluru Stampede : बंगळुरुमध्ये आरसीबीच्या विजयी परेडच्या दरम्यान चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली असून यामध्ये किमान ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच १५ पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. या घटनेतील जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.

तसेच आरसीबीनेही निवेदन जारी करत प्रतिक्रिया दिली आहे. तसेच आता या घटनेबाबत विराट कोहलीनेही प्रतिक्रिया दिली आहे. चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाल्यानंतर आरसीबीने प्रसिद्ध केलेलं निवेदन विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर शेअर करत थोडक्यात प्रतिक्रिया दिली आहे. माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द नसून या घटनेनंतर खूप दु:खी असल्याचं विराट कोहलीने म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

आरसीबीने निवेदनात काय म्हटलं?

चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर आरसीबीने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं की, “आज दुपारी संघाच्या आगमनानंतर बेंगळुरूमध्ये झालेल्या सार्वजनिक कार्यक्रमावेळी दुर्दैवी घटनेची माहिती माध्यमांच्या वृत्तांनंतर आम्हाला समजली. आम्हाला खूप दुःख झालं असून सर्वांची सुरक्षितता आमच्यासाठी महत्त्वाची आहे. या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल आरसीबी शोक व्यक्त करत आहे. तसेच पीडित कुटुंबांना आम्ही मनापासून संवेदना व्यक्त करतो. परिस्थितीची जाणीव होताच आम्ही आमच्या कार्यक्रमात बदल केले आहेत. तसेच स्थानिक प्रशासनाच्या मार्गदर्शनाचे आणि सल्ल्याचे पालन करत आहोत. आम्ही आमच्या सर्व समर्थकांना कृपया सुरक्षित राहण्याचं आवाहन करतो”, असं आरसीबीने म्हटलं आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या काय म्हणाले?

“चिन्नास्वामी स्टेडियम या ठिकाणी घडलेली घटना दुर्दैवी आहे. इतक्या मोठ्या संख्येने लोक येतील याची पुसटशीही कल्पना आम्हाला नव्हती. साधारण तीन लाख लोक या ठिकाणी जमा झाले होते. मैदानाची क्षमता ३५ हजार इतकीच आहे. आम्हाला वाटलं होतं की साधारण या संख्येहून काही जास्त लोक येतील. ज्या ११ जणांचा या घटनेत मृत्यू झाला आहे त्यापैकी बरेच तरुण-तरुणी आहेत”,असं सिद्धरामय्या यांनी म्हटलं.

उच्चस्तरीय चौकशीचे करण्याचे आदेश

चेंगराचेंगरीत ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांना आम्ही १० लाखांची मदत जाहीर करत आहोत, अशीही घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे. तसंच घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आणि अनपेक्षित होती असंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच चेंगराचेंगरीची घटना कशी घडली? याची उच्चस्तरीय चौकशीचे करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी यांनी दिली आहे.