Rishabh Pant Century in 2nd Inning of IND vs ENG 1st Test: ऋषभ पंतने इंग्लंड दौऱ्यावरील पहिल्याच कसोटीत विक्रमी शतक झळकावलं आहे. पंतने दोन्ही डावात उत्कृष्ट कामगिरी करत दणदणीत शतक पूर्ण केलं. पंतने पहिल्या डावात १३४ धावा केल्या. तर आता दुसऱ्या डावात त्याने १३ चौकार आणि २ षटकारांसह आपलं विक्रमी शतक पूर्ण केलं आहे. ऋषभ पंतने या शतकानंतर त्याचं आयकॉनिक कोलांटी उडी मारून सेलिब्रेशन न करता देवाचे आभार मानले.

भारत-इंग्लंडच्या पहिल्याच कसोटी सामन्यात दोन्ही संघ चुरशीची लढत देत आहेत. ऋषभ पंतने राहुलच्या साथीने चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात राहुलबरोबर काळजीपूर्वक फलंदाजी करत इंग्लंडला एकही विकेट दिली नाही. ऋषभ पंतच्या आधी केएल राहुलनेही कमालीचं शतक झळकावलं. या दोन्ही खेळाडूंच्या शतकाच्या जोरावर भारताची आघाडी ३०० धावांच्या जवळ पोहोचली आहे.

भारताकडून दोन्ही डावात शतक झळकावणारा पंत सातवा खेळाडू ठरला आहे. विजय हजारे, सुनील गावस्कर, राहुल द्रविड, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा यांच्या मांदियाळीत त्याने स्थान मिळवलं आहे. याशिवाय ऋषभ पंतने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत.

ऋषभ पंतने पहिल्या डावात १४६ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकारांसह १०५ धावा करत आपलं शतक पूर्ण केलं. ऋषभ पंतने शोएब बशीरच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर षटकार लगावत ऐटीत आपलं शतक पूर्ण केलं. पंतने त्याचं शतक पूर्ण करताच त्याने हेल्मेट काढत हात हवेत उंचावले. यानंतर त्याने हेल्मेट, बॅट मैदानावर ठेवली, ग्लोव्ह्ज काढले आणि कोलांटी उडी घेत आपल्या शतकाचा आनंद साजरा केला. यानंतर त्याने जाऊन गिलला मिठी मारली. पुन्हा आपल्या क्रीझकडे परतताना आकाशाकडे पाहत त्याने देवाचे आभार मानले. पंतच्या या सेलिब्रेशनचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

हल्ली ऋषभ पंत शतक केल्यानंतर मैदानातच कोलांटी उडी मारत त्याच्या शतकाचा आनंद साजरा करतो. पण त्याने दुसऱ्या डावातील शतकानंतर आपल्या आयकॉनिक स्टाईमलमध्ये सेलिब्रेशन केलं नाही. स्टँन्डसमधून सुनील गावस्कर त्याचं शतक पाहून त्याचं कौतुक करत होते. दरम्यान त्यांनी पंतला कोलांटी उडी मार असं इशारा करत सांगितलं. पण त्याने नंतर करेन असं हावभावाद्वारे सांगितलं. या क्षणाचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.