Rohit Sharma Loses 20 Kg Weight: रोहित शर्मा गेल्या बऱ्याच काळापासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. २०२४ मध्ये टी-२० आणि २०२५ च्या सुरूवातीला हिटमॅनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आयपीएल २०२५ मध्ये रोहित शर्मा अखेरचा क्रिकेटच्या मैदानावर खेळताना दिसला होता. त्यामुळे रोहित शर्माला परत मैदानावर खेळताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत. यादरम्यान रोहितच्या फिटनेसबाबत प्रश्न उपस्थित होत असताना हिटमॅनने वजन घटवल्याचे फोटो व्हायरल होत आहेत.
रोहित शर्माचं वय आणि त्याचा फिटनेस पाहता तो आगामी वनडे वर्ल्डकपमध्ये खेळणार की नाही, याबाबत सगळीकडेच जोरदार चर्चा होती. दरम्यान रोहित शर्माने २० किलो वजन घटवत त्याच्या फिटनेसच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. रोहित शर्माचा वजन घटवण्यापूर्वीचा आणि नंतरचा फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रोहितच्या एअरपोर्टवरील लूकवर तर चाहते फिदा झाले आहेत आणि त्यांनी एकापेक्षा एक भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हिटमॅनचा फिटमॅन अवतार!
रोहित शर्मा आयपीएल २०२५ नंतर त्याच्या कुटुंबासह युरोप दौऱ्यावर सहलीसाठी गेला होता. यानंतर भारतात परतल्यावरचा एअरपोर्टवरील रोहित शर्माचा फोटो आणि आता त्याच्या काही महिन्यांनंतर २० किलो वजन घटवल्यानंतर रोहितचा फोटो व्हायरल होत आहे. चाहतेदेखील या फोटोवर कमेंट करत हिटमॅनचं कौतुक करत आहेत. हिटमॅन वर्ल्डकपसाठी तयार असल्याचं देखील चाहते म्हणताना दिसत आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ लवकरच जाहीर होणार आहे. ही मालिका १९ ऑक्टोबरपासून सुरू होईल. या मालिकेपूर्वी आणि आशिया चषकापूर्वी भारतीय खेळाडूंच्या फिटनेस चाचण्या घेण्यात आल्या होत्या. रोहित शर्मानेही यादरम्यान नवी ब्रॉन्को टेस्ट दिली होती. रोहित शर्माने ही या नव्या चाचणीमध्ये कमालीची कामगिरी केली आहे.
रोहित शर्मा ब्रॉन्को टेस्टनंतर मुंबईला परतला तेव्हा विमानतळावर त्याला पाहण्यासाठी नेहमीप्रमाणेच गर्दी होती. यावेळी रोहित शर्मा खूपच फिट दिसत होता. रोहित शर्मा क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी, जेव्हा रोहित शर्मा त्याच्या कुटुंबासह सुट्ट्यांवरून परतला तेव्हा त्याचं वजन फार वाढल्याचं दिसत होतं. त्याचं पोटदेखील सुटलं होतं, पण फक्त काही दिवसांत त्याने २० किलो वजन घटवत फिटनेसच्या चर्चांना पूर्णविराम दिला.
ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गजांचं संघात पुनरागमन होणार आहे. १९, २३ आणि २५ ऑक्टोबरला हे सामने होणार आहेत. याआधी भारतीय अ संघ ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध ३० सप्टेंबर, ३ आणि ५ ऑक्टोबर रोजी कानपूर इथे खेळणार आहे. रोहित वनडे मालिकेच्या तयारीचा भाग म्हणून अ संघाकडून खेळणार का हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.