World Cup 2027 Team India: मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच झालेल्या एकदिवसीय मालिकेची सांगता भारताने दिमाखात केली. तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या व अंतिम सामन्यात भारताने नऊ गडी राखून सहज विजय मिळवलाच. पण तो शतकवीर रोहित शर्मा आणि अर्धशतकवीर विराट कोहली यांनी नाबाद राहून साकारला. त्यामुळे या दोन्ही महान फलंदाजांना विश्वचषक २०२७ स्पर्धेतही भारतीय संघाकडून खेळू द्यावे, या मागणीने जोर धरला आहे. त्यात भावनावेग अधिक आणि रोकडी तर्कसंगती कमी दिसते.

ही मालिका भारताने १-२ अशी गमावली. पहिले दोन सामने जिंकून ऑस्ट्रेलियाने २-० अशी आघाडी घेतली होती, त्यामुळे तिसरा सामना बिनमहत्त्वाचा म्हणजेच ‘डेड रबर’ होता. या सामन्यात निम्मी कामगिरी भारताच्या गोलंदाजांनी केली. त्यांनी ऑस्ट्रेलियाला २३६ अशा माफक धावसंख्येवर रोखून धरले. सिडनीची खेळपट्टी आधीच्या, विशेषतः पर्थच्या खेळपट्टीपेक्षा अधिक फलंदाजीस अनुकूल होती. तो सामना पहिला. दुसऱ्या सामन्यातही तुलनेने अधिक अनुकूल अॅडलेडच्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांना पुरेशा धावा जमवता आल्या नाहीत. विराट पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये शून्यावर बाद झाला. पावसाने व्यत्यय आणलेल्या पहिल्या सामन्यात रोहितने ८ धावा जमवल्या, तरी दुसऱ्या सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी केली. सिडनीतील अंतिम सामन्यात मात्र रोहितने १२१ धावांची खेळी साकारली, विराटनेही दमदार ७४ धावा केल्या.

Rohit Sharma or Virat Kohli : ‘मॅच प्रॅक्टिस’ कशी मिळणार?

दोघेही फलंदाज बऱ्याच अवधीनंतर एकदिवसीय क्रिकेट खेळत होते, त्यामुळे त्यांना जम बसण्यास वेळ लागला असे सांगितले जाते. खरे म्हणजे या दोघांचाही प्रदीर्घ अनुभव आणि अफाट गुणवत्ता पाहता, जिंकण्याविषयी असीम ईर्षा आणि खेळाचे सखोल आकलन गृहित धरता, विद्यमान जगज्जेत्यांविरुद्ध ते पहिल्या सामन्यापासूनच तयारीत असणे अपेक्षित आहे. विश्वचषक स्पर्धा २०२७मध्ये होत असली, तरी दरम्यानच्या काळात एकदिवसीय क्रिकेटबाबत दुष्काळी परिस्थितीच कायम राहणार हे उघड आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आगामी एकदिवसीय मालिकेत ते काही सामने खेळू शकतात. पण त्यानंतर बराच काळ ती संधी मिळणार नाही. एकदिवसीय क्रिकेटच्या बाबतीत एक गमतीशीर विरोधाभास आढळून येतो.

क्रिकेटच्या तिन्ही प्रारूपांपैकी सर्वांत कमी सामने याच प्रारूपात खेळले जातात. तरीदेखील आजही क्रिकेटमधील सर्वाधिक प्रतिष्ठेचे अजिंक्यपदही याच प्रकारातील गणले जाते! ट्वेण्टी-२० आणि कसोटी या प्रकारांतील जगज्जेतेपदांना अजून तितकी प्रतिष्ठा नाही हे अमान्य करता येत नाही. तरीदेखील एकदिवसीय क्रिकेटच्या सामन्यांना भरगच्च वेळापत्रकात फार स्थान मिळतच नाही. फ्रँचायझी क्रिकेटची गर्दी आणि कसोटी प्रकाराला किमान बड्या तिघांची पसंती (भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया) यामुळे इतर दोन प्रकार अधिक खेळवले जातात. अशा परिस्थितीत दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियात होणाऱ्या विश्वचषकाआधी रोहित-विराटच काय, पण इतरांनाही फार सराव करायला मिळेल, अशी चिन्हे नाहीत.

Rohit Sharma or Virat Kohli : दोघांपैकी एकच?

रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही सध्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक वयस्कर भारतीय क्रिकेटपटू ठरतात. रोहित ३८ वर्षांचा आहे नि विराट ३६ वर्षांचा. विश्वचषक स्पर्धेपर्यंत दोघेही अनुक्रमे ४० आणि ३८ वर्षांचे होतील. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच काय, पण कोणत्याही मैदानी क्रीडा प्रकारात अशा वयाच्या खेळाडूंना उतरवणे हे खेळाडू आणि संघ अशा दोहोंसाठी जोखमीची बाबच ठरते. ती जोखीम या दोघांच्या बाबतीत पत्करावी असा सल्ला अनेक माजी क्रिकेटपटू(च) देत आहेत. रोहितने स्वतःच्या तंदुरुस्तीकडे विशेष लक्ष दिले असून, वजनही घटवलेले दिसते. विराटच्या बाबतीत तंदुरुल्तीचा प्रश्न सहसा उद्भवत नाही. तो चाळीशीनंतरही खेळू शकतो, अशी चर्चा सुरू आहे.

या सगळ्या चर्चांचे सार असे, की ‘फलंदाज रोहित’ आणि ‘फलंदाज विराट’ असे दोघे जण विश्वचषकात खेळणार असतील तर का खेळवू नयेत? परंतु रोहित आणि विराट यांच्या वैयक्तिक कामगिरीवरच संघाचे भवितव्य अवलंबून नाही. त्यांची ‘व्यक्तिमत्त्वे’ही जमेस धरावी लागतील. हे दोघेही, विद्यमान कर्णधार शुभमन गिलच्या व्यूहरचनेत आणि व्यक्तिरचनेत किती चपखल बसतात यावर त्यंचे आणि संघाचे यश अवलंबून आहे. केवळ तीन सामन्यांच्या आधारे (ते यशही निर्भेळ नाहीच) त्यांची विश्वचषक संघात स्थाननिश्चिती करणे सध्या थोडे घाईचेच ठरेल. दोघेही माजी कर्णधार आहेत, त्यांचे कर्णधारपदाविषयी स्वतःचे असे आडाखे आणि धारणा आहेत. शुभमन आणि त्याच्या जोडीला प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या योजनांची, रचनेशी त्यांना जुळवून घ्यावेच लागेल. फलंदाज म्हणून त्यांचे स्वतंत्र आणि अलिप्त मूल्यांकन होईल. दोघेही फलंदाज म्हणून महान असले, तरी प्रत्यक्ष सामन्यांमध्ये किंवा स्पर्धेत त्यांची कामगिरी कशी होत आहे यावर लक्ष केंद्रित होईल.

विराट प्रत्यक्ष स्पर्धेत पहिल्या दोन सामन्यांत शून्यावर बाद झाला तर तिसऱ्या सामन्यासाठी त्याचा विचारही होऊ नये, अशी आक्रमक मानसिकता गिल-गंभीर दुकलीची आहे. अशा वळी त्यास खेळवावे म्हणून त्याही वेळी दबाव येईल, त्या रेट्याशी सामना करण्यासाठी ऊर्जा दवडावी की स्पर्धेवर लक्ष केंद्रित करावे, हा पेच गुंतागुंतीचा ठरतो. त्यासंबंधी गिल-गंभीरने विद्यमान निवड समिती सदस्य अजित आगरकरकडे चर्चा करण्याची आणि गंभीर याच्या नावार फुली मारण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विराट तसाही मनाने क्रिकेटपासून दूर निघालेला दिसतो. तो कसलेला फलंदाज आणि नैसर्गिक कर्णधार आहे. धावा होत नसतील आणि नेतृत्व नसेल, तर त्याच्याकडून १०० टक्के योगदान मिळेलच, याची खात्री नाही. मात्र त्याचे संघात असणे इतरांस झाकोळणारे ठरते हेही खरे. रोहितचे मात्र तसे नाही.

Rohit Sharma or Virat Kohli : …मग रोहितच योग्य!

रोहित शर्माने कर्णधार बनल्यानंतर स्वतःच्या खेळात जाणीवपूर्वक बदल केला. एकदिवसीय क्रिकेटमधील अनेक विक्रम त्याच्या नावावर आहेत आणि हे त्याने सलामीचा फलंदाज असूनही साध्य केले आहे. परवा सिडनीच्या सामन्यात तो १००हून अधिक चेंडू खेळला. गेल्या पाच वर्षांत हे केवळ दुसऱ्यांदा घडले. त्याने अतिआक्रमक खेळाला पसंती दिल्यामुळे तो बहुतेकदा १०० चेंडू टिकायचाच नाही. पण हा त्याग त्याने संघासाठी केला आणि त्याची फळे मिळाली. समोरच्या संघावर जोरदार हल्ला चढवायच्या नि दुसरीकडे गिल आणि विराट यांनी विकेट शाबूत ठेवून प्रदीर्घ खेळी करायची हे रोहितचे डावपेच बहुतेक सामन्यांमध्ये यशस्वी ठरले. विश्वचषक २०२३मधील अंतिम सामन्याचा अपवाद नसता तर रोहितच्या नावावर एक जगज्जेतेपदही नोंदवले गेले असते. त्याचे हेच डावपेच पुढील विश्वचषकातही संघासाठी लाभदायी ठरू शकते. या बाबतीत विराट अंशतः यशस्वी ठरला, तर रोहित बहुतांश यशस्वी ठरला.

मैदानावर क्षेत्ररक्षक म्हणून तो विराटइतका चपळ कधीच नव्हता आणि केवळ या निकषावर त्याच्याऐवजी विराटला स्वाभाविक पसंती मिळते. फलंदाज म्हणून सध्याचा रोहित सध्याच्या विराटपेक्षा अधिक विध्वंसक आहे. यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, ऋषभ पंत यांच्यात रोहित शर्मा हा एक अनुभवी फलंदाज पुरेसा आहे. विराट-रोहित दोघांचा मोह टाळता आला नाही आणि दोघांना सूर गवसला नाही, तर गुणवत्ता उपलब्ध असूनही केवळ वलयांकित खेळाडूंच्या आग्रहापायी संधी दवडल्यासारखे होईल. ‘कर्णधार रोहित’ हा ‘कर्णधार विराट’पेक्षा अधिक यशस्वी होता आणि अलीकडच्या काळात त्याने दोन करंडक जिंकून दिले. तेव्हा मार्गदर्शक म्हणूनही त्याचा लाभ विराटपेक्षा अधिक संभवतो. यासाठी तूर्त तरी रोहित शर्मा याचाच विश्वचषक २०२७ साठी भारतीय संघात विचार व्हायला हरकत नाही.