Champions Trophy Rohit Sharma Press Conference: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला सुरूवात झाली आहे. भारतीय संघाचा पहिला सामना दुसऱ्याच दिवशी म्हणजेच २० फेब्रुवारीला दुबईमध्ये खेळवले जाणार आहेत. पाकिस्तानकडे या स्पर्धेचे यजमानपद असले तरी भारतीय संघाचे सर्व सामने दुबईमध्ये होणार आहेत. भारतीय संघ बांगलादेशविरूद्ध सामन्यासह आपल्या मोहिमेला सुरूवात करणार आहे. तत्त्पूर्वी रोहित शर्मा पत्रकार परिषदेसाठी रोहित शर्मा उपस्थित होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा झाल्यापासून एक मुद्दा चर्चेत आहे. तो म्हणजे भारतीय संघ ५ फिरकीपटूंसह चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार आहे. पण संघाने इतक्या फिरकीपटूंना संघात का स्थान दिलं, यावर जोरदार चर्चा सुरू आहे. रोहित शर्माने पत्रकार परिषदेत या प्रश्नावर उत्तर दिलं आहे आणि यामागची रणनितीदेखील सांगितली.

भारतीय संघात रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव आणि वरूण चक्रवर्ती हे पाच फिरकीपटू आहेत. तर अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहच्या जागी संघात सामील झालेला हर्षित राणा हे तीन वेगवान गोलंदाज आहेत.

पत्रकार परिषदेदरम्यान रोहित शर्माला विचारण्यात आले की, संघातील पाच फिरकीपटूंबद्दल तुमचे मत काय आहे? यावर रोहित म्हणाला, “आमच्या संघात पाच फिरकीपटू नाहीत, संघात दोन फिरकीपटू आहेत आणि त्यापैकी तीन अष्टपैलू आहेत. मी त्यांच्याकडे पाच फिरकीपटू म्हणून पाहत नाही. रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर संघाला अधिक बळकट बनवतात. जर संघात पाच वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडू असते तर कोणी असं म्हटलं नसत की अरे संघात ५-६ वेगवान गोलंदाज आहेत. आम्ही नेहमीच आमची ताकद काय आहे हे पाहतो आणि त्याला पाठिंबा देखील देतो.”

रोहितने आठ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल उत्साह व्यक्त केला. हिटमॅनला स्पर्धेदरम्यान संघाच्या शैलीबद्दल देखील विचारण्यात आले होते. रोहित शर्मा म्हणाला, “आम्ही इतर आयसीसी स्पर्धांमध्ये जसे खेळतो तसेच आम्ही या स्पर्धेत खेळू. भारतासाठी खेळणं आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. काही वेळा तुम्हाला काही खेळाडूंची उणीव भासते, पण हा संघही बळकट आहे.”

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघ अ गटात असून त्यात बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंडचाही समावेश आहे. पहिलाच सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू आहे. ज्यात न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना ३२० धावा केल्या आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma statement on 5 spinner in india champions trophy squad said not 5 we have 2 spinners ind vs ban bdg