बाद फेरीत प्रवेशासाठी करो या मरो अशा लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या स्नेह राणा आणि रिचा घोष यांनी विजयासाठी प्रयत्नांची शर्थ केली. पण ती अपुरीच ठरली. उत्तर प्रदेश वॉरियर्झ संघाने १२ धावांनी विजय मिळवला. पराभवासह बंगळुरूचं आणि विजयानंतरही उत्तर प्रदेशचं आव्हान संपुष्टात आलं आहे.
दिल्ली कॅपिटल्स, गुजरात, मुंबई इंडियन्स हे संघ बाद फेरीसाठी पात्र ठरले आहेत. लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर झालेल्या या लढतीत तब्बल ४३८ धावा चोपल्या गेल्या. वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेत एका सामन्यात दोन्ही डाव मिळून सर्वोच्च धावसंख्या आहे.
उत्तर प्रदेश वॉरियर्झ संघाने प्रथम फलंदाजी करताना २२५ धावांचा डोंगर उभारला. जॉर्जिआ व्हॉलने ९९ धावांची खेळी केली. या खेळीत १७ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. ग्रेस हॅरिसने ३९ तर किरन नवगिरेने ४६ धावांची खेळी करत जॉर्जिआला चांगली साथ दिली. किरणने २ चौकार आणि ५ षटकारांसह आक्रमक खेळी साकारली. बंगळुरूकडून जॉर्जिआ वारेहमने २ विकेट्स घेतल्या.
प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार स्मृती मन्धाना झटपट माघारी परतली. सबिनेही मेघनाने २७ धावांची खेळी केली. अनुभवी एलिस पेरीने १५ चेंडूत २८ धावा केल्या पण अंजली सर्वानीने तिला बाद केलं. राघवी बिश्तने १४ धावा केल्या. एका बाजूने सातत्याने सहकारी बाद होत असताना ऋचा घोषने बॅटचा तडाखा देत ३३ चेंडूत ६९ धावांची अविश्वसनीय खेळी केली. तिने ६ चौकार आणि ५ षटकारांसह थराराक खेळी साकारली.
स्नेह राणाने ६ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांसह २६ धावा करत बंगळुरूच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. बंगळुरूने १९व्या षटकात १९ धावा वसूल केल्या. स्नेह आणि रिचा दोघेही बाद झाल्या आणि बंगळुरूच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या. धावगतीचं आव्हान वाढत असताना ऋचा आणि स्नेह यांनी वादळी फटकेबाजी करत उत्तर प्रदेश संघाच्या अडचणी वाढल्या. सोफी इक्लेस्टोन आणि दिप्ती शर्मा यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.
© IE Online Media Services (P) Ltd