Cricketers Reaction On RCB Victory Parade Stampede Incident: आयपीएल २०२५ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी उंचावली. या विजयानंतर बंगळुरूत जोरदार जल्लोष करण्यात आला. मात्र,या जल्लोषाला गालबोट लागलं आहे. बंगळुरूत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयाचं सेलिब्रेशन करण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. यादरम्यान चिन्नास्वामी स्टेडियममध्ये प्रवेश मिळवण्यासाठी चाहत्यांनी धक्काबुक्की केली. यादरम्यान चेंगराचेंगरीची घटना घडल्याने ११ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर ४७ हून अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेवर क्रिकेट विश्वातूनही अनेक दिग्गज खेळाडूंनी शोक व्यक्त केला आहे.
सचिन तेंडुलकरने पोस्ट शेअर करत व्यक्त केला शोक
या दुर्देवी घटनेनंतर सचिन तेंडुलकरने पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे. त्याने एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत लिहिले,”बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये घडलेली घटना ही खूप दुःखद आहे. या घटनेतील पीडित कुटुंबाप्रति मनापासून संवेदना आहेत. कुटुंबांना हे दुःख पचवून घेण्याचं बळ मिळो ही प्रार्थना.”
सचिन तेंडुलकरसह भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने देखील एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करून श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने लिहिले, “उत्सवाच्या क्षणाचं अचानक अकल्पनिय दुर्घटनेत रुपांतर झालं. बंगळुरूत घडलेल्या सर्व पीडित कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. पीडित कुटुंबियांना देव या दु:खातून सावरण्याचं बळ देवो.”
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील फलंदाज विराट कोहलीने देखील या घटनेनंतर पोस्ट शेअर करत पीडित कुटुंबियांना श्रद्धांजली वाहिली आहे. विराटने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शेअर केलेलं पोस्ट रिपोस्ट केलं आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं ,” आज दुपारी आमच्या संघाच्या आगमनानंतर बेंगळुरूमध्ये झालेल्या सार्वजनिक कार्यक्रमावेळी दुर्दैवी घटनेची माहिती माध्यमांच्या वृत्तांनंतर आम्हाला समजली. आम्हाला खूप दुःख झालं असून सर्वांची सुरक्षितता आमच्यासाठी महत्त्वाची आहे. या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल आरसीबी शोक व्यक्त करत आहे. तसेच पीडित कुटुंबांना आम्ही मनापासून संवेदना व्यक्त करतो. परिस्थितीची जाणीव होताच आम्ही आमच्या कार्यक्रमात बदल केले आहेत. तसेच स्थानिक प्रशासनाच्या मार्गदर्शनाचे आणि सल्ल्याचे पालन करत आहोत. आम्ही आमच्या सर्व समर्थकांना कृपया सुरक्षित राहण्याचं आवाहन करतो.” या दु:खद घटनेनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून पीडित कुटुंबियांना १० लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.