बंगळूरु : आंतरखंडीय स्पर्धेतील विजेतेपदाच्या कामगिरीनंतर भारतीय फुटबॉल संघ आज आपल्या ‘सॅफ’ फुटबॉल स्पर्धेच्या मोहिमेला सुरुवात करेल. सलामीच्या लढतीत भारताची गाठ पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी पडणार असून, या सामन्यात भारताचेच पारडे जड राहणार आहे. श्री कांतीरावा स्टेडियमवर हा सामना होणार आहे. पाकिस्तानी संघाचा अगदी ऐनवेळी या स्पर्धेसाठी ‘व्हिसा’ मंजूर झाल्याने या सामन्यामधील सर्व अडथळे आता दूर झाले आहेत.

पाकिस्तान संघात भारतासमोर आव्हान उभे करण्याची फारशी ताकद नसली, तरी भारतीय संघ त्यांना हलक्याने न घेता पूर्ण ताकदीने या सामन्यात उतरून आपले वर्चस्व दाखवून देण्यासाठी उत्सुक आहे. भारताचा ‘अ’ गटात समावेश असून, नेपाळ, कुवैत, पाकिस्तान हे गटातील अन्य संघ आहेत. लेबनान, मालदीव, भूतान आणि बांगलादेश या अन्य देशांच्या संघांचा समावेश ‘ब’ गटात करण्यात आला आहे.

वेळ : सायं. ७.३० वा.
थेट प्रक्षेपण : फॅनकोड अ‍ॅप