Shreyas Iyer Replacment As Vice captain: भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरू आहे. टी-२० मालिका सुरू होण्याआधी दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. ही मालिका भारतीय संघाला २-१ ने गमवावी लागली. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी मोठी भागीदारी करून भारतीय संघाला एकहाती विजय मिळवून दिला. पण याच सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना श्रेयस अय्यर गंभीर दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याला मैदान देखील सोडावं लागलं होतं.
अॅलेक्स कॅरेचा झेल पकडताना श्रेयसच्या बरगड्यांना गंभीर दुखापत झाली होती. अंतर्गत रक्तस्रावामुळे त्याला आयसीयूतमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण आता तो दुखापतीतून सावरला आहे. ३० ऑक्टोबरला त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या दुखापतीबाबत अपडेट दिली आहे. मात्र, डॉक्टरांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे महिनाभर तरी त्याला क्रिकेटपासून दूर राहावं लागणार आहे. भारतीय संघाला येत्या काही दिवसात वनडे मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरूद्ध दोन हात करायचे आहेत. या मालिकेत श्रेयस अय्यर खेळताना दिसण्याची शक्यता खूप कमी आहे. दरम्यान श्रेयसच्या जागी कोणाला संधी मिळू शकते? जाणून घ्या.
हे ३ खेळाडू आहेत प्रबळ दावेदार
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला आहे. रोहित शर्माला कर्णधारपदावरुन काढून ही जबाबदारी युवा फलंदाज शुबमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. तर संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी श्रेयस अय्यरकडे सोपवली गेली आहे. दरम्यान ही जबाबदारी केएल राहुलकडे सोपवली जाऊ शकते. २०२३ वर्ल्डकप स्पर्धेपासून तो भारतीय संघातील प्रमुख यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडत आहे. तसेच केएल राहुल हा संघातील अनुभवी खेळाडू देखील आहे. त्यामुळे ही जबाबदारी केएल राहुलकडे सोपवली जाण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
हार्दिक पंड्या
हार्दिक पंड्या ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या वनडे मालिकेत दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. पण दक्षिण आफ्रिकेविरूद्ध होणाऱ्या मालिकेत तो पुनरागमन करण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. हार्दिक पंड्या देखील संघातील अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. त्यामुळे श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत हार्दिक पंड्या देखील ही जबाबदारी पार पडण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. आशिया चषक २०२५ स्पर्धेतून तो दुखापतीमुळे बाहेर पडला होता. त्यामुळे तो अंतिम सामना खेळू शकला नव्हता. याच कारणास्तव त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाता स्थान दिलं गेलेलं नाही. पण फिट झाल्यानंतर तो दक्षिण आफ्रिकेविरूद्ध होणाऱ्या मालिकेतून पुनरागमन करू शकतो.
ऋषभ पंत
भारतीय संघातील यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत देखील इंग्लंड दौऱ्यावर कसोटी मालिका सुरू असताना दुखापतग्रस्त झाला होता. पण लवकरच तो फिट होऊन पुन्हा एकदा भारतीय संघात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. ऋषभ दुखापतीतून सावरल्यानंतर वनडे संघातही पुनरागमन करू शकतो. सध्या त्याच्याकडे भारतीय अ संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पण लवकरच तो वनडे संघात पुनरागमन करताना दिसून येऊ शकतो. असं झाल्यास त्याच्याकडे वनडे संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी देखील सोपवली जाऊ शकते.
