Gary Kirsten On Shubman Gil: भारताच्या इंग्लंड दौऱ्यासाठी शुबमन गिलची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने कसोटी क्रिकेटला रामराम केल्यानंतर ही मोठी जबाबदारी गिलकडे सोपवण्यात आली आहे. कर्णधार बनल्यानंतर त्याने फलंदाज म्हणून स्वत:ला सिद्ध केलं आहे. आतापर्यंत त्याने ३ शतकं झळकावली आहे. पण, कर्णधार म्हणून तो अजूनही स्वत:ला सिद्ध करू शकलेला नाही. भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी गिलच्या नेतृत्वाबाबत आपलं मत मांडलं आहे.

भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी रेडिफला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, ” मला वाटतं त्याच्याकडे (गिलकडे) खूप क्षमता आहे. नेतृत्व करताना अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला एकत्र कराव्या लागतात. तो या खेळातील उत्तम विचारवंत आहे. यासह उत्तम फलंदाज देखील आहे. पण गोष्ट जेव्हा नेतृत्वाची येते,तेव्हा या दोन गोष्टी पुरेशा नसतात. नेतृत्वात मॅन मॅनेजमेंट खूप महत्वाचं असतं. धोनीकडे ही कला होती. जर गिलने ही कला शिकून घेतली, तर तो देखील धोनीसारखा महान कर्णधार बनू शकतो.”

शुबमन गिल खेळाडू आणि कर्णधार म्हणून कसा आहे, हे गॅरी कर्स्टनला चांगलंच माहीत आहे. कारण गिल आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्स संघाकडून खेळतो. गॅरी कर्स्टन गेल्या ३ वर्षांपासून या संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये आहे. गिलबद्दल बोलताना गॅरी कर्स्टन म्हणाले, ” गिलला आपला खेळ आणि टेक्निक चांगली माहीत आहे. त्याच्यासोबत क्रिकेटविषयी गप्पा मारणं खूप खास असतं. मलाही त्याच्याकडून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत.

शुबमन गिलने या मालिकेत फलंदाज म्हणून स्वत:ला सिद्ध केलं आहे. पण कर्णधार म्हणून अजूनही तो संघर्ष करत आहे. मालिकेतील पहिला सामना लीड्समध्ये पार पडला होता. या सामन्यात भारतीय संघाला धावांचा बचाव करताना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर एजबस्टनच्या मैदानावर झालेल्या सामन्यात भारतीय संघाने ऐतिहासिक विजयाची नोंद केली होती. यासह मालिका १-१ ने बरोबरीत आणली होती. त्यानंतर लॉर्ड्सच्या मैदानावर झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला १९३ धावांचा पाठलाग करताना २२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे भारतीय संघ या मालिकेत १-२ ने पिछाडीवर आहे. मालिकेतील चौथा सामना २३ जुलैपासून मँचेस्टरच्या मैदानावर रंगणार आहे. भारतीय संघाला जर मालिका जिंकायची असेल, तर मालिकेतील पुढील दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत.