मँचेस्टर : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील आव्हान शाबूत ठेवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासमोरील आव्हानांमध्ये वाढच होताना दिसत आहे. ऋषभ पंत, अर्शदीप सिंग आणि आकाश दीप यांच्या दुखापतींची चिंता असतानाच आता भारताला आणखी एक धक्का बसला आहे. गेल्या दोन कसोटींत खेळलेला अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी गुडघ्याच्या दुखापतीमुळे उर्वरित मालिकेत खेळू शकणार नाही. त्यातच मँचेस्टरच्या ‘ओल्ड ट्रॅफर्ड’ मैदानावरील इतिहासही भारताच्या विरोधातच असल्याने उद्या, बुधवारपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटीत गिलच्या नेतृत्वाचा खऱ्या अर्थाने कस लागणार आहे.

पहिल्या तीन कसोटींत गिलच्या नेतृत्वाबाबत बरीच चर्चा करण्यात आली. त्याच्या काही निर्णयांचा भारताला मोठा फायदा झाला, तर काही वेळा कर्णधार म्हणून त्याच्यातील नवखेपणा दिसून आला. पहिल्या कसोटीत त्याने धाडसी निर्णय घेणे टाळले होते. इंग्लंडच्या फलंदाजांनी चूक करण्याची तो वाट पाहत राहिल्याची टीका झाली. दुसऱ्या कसोटीत फलंदाज म्हणून दोन डावांत मिळून केलेल्या ४३० धावांचा त्याच्या नेतृत्वावरही सकारात्मक परिणाम झाला. मात्र, लॉर्डसवर झालेल्या तिसऱ्या कसोटीत गिलकडून पुन्हा काही चुका झाल्या. विशेषत: इंग्लंडच्या दुसऱ्या डावात वॉशिंग्टन सुंदरला उशिराने गोलंदाजी देणे भारताला महागात पडले. पाच सामन्यांच्या या मालिकेत भारतीय संघ आता १-२ असा पिछाडीवर असल्याने या पुढील दोनही सामन्यांत त्याच्या नेतृत्वात अधिक अचूकता गरजेची झाली आहे.

गिलला काही प्रश्नांची उत्तरेही शोधावी लागतील. गेल्या कसोटीत यष्टिरक्षण करताना ऋषभ पंतच्या बोटाला दुखापत झाली. त्यामुळे मँचेस्टर कसोटीत त्याला पुन्हा यष्टिरक्षक म्हणून खेळविण्याचा धोका पत्करायचा की ध्रुव जुरेलकडे यष्टिरक्षणाची धुरा सोपवून पंतला केवळ फलंदाज म्हणून खेळवायचे हे गिलला ठरवावे लागेल. तसेच या कसोटीत पराभव झाल्यास भारतीय संघ मालिकाच गमावून बसेल. त्यामुळे या कसोटीत जसप्रीत बुमरा खेळणे अपेक्षित आहे. मोहम्मद सिराजची त्याला साथ लाभेल. मात्र, तिसरा वेगवान गोलंदाज कोण, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हाताच्या दुखापतीमुळे अर्शदीप सिंग चौथ्या कसोटीला मुकणार असल्याचे ‘बीसीसीआय’ने स्पष्ट केले आहे. या मालिकेतील दुसऱ्या कसोटीत १० बळी मिळविणाऱ्या आकाश दीपची दुखापतही चौथ्या कसोटीपूर्वी बरी होण्याची शक्यता कमी आहे. अशात नवोदित अंशुल कम्बोजवर विश्वास दाखवावा लागू शकेल.

त्यातच रविवारी ‘जीम’मध्ये व्यायाम करताना नितीश कुमार रेड्डीला दुखापत झाली. ‘‘डाव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे नितीशला उर्वरित दोन सामन्यांना मुकावे लागणार असून तो आता मायदेशी परतेल,’’ असे ‘बीसीसीआय’कडून सांगण्यात आले. त्यामुळे भारताला संघात आणखी एक बदल करणे अनिवार्य झाले आहे.

‘ओल्ड ट्रॅफर्ड’वर पाटी कोरी

– भारतीय संघाने सध्या सुरू असलेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटीत बर्मिंगहॅम येथे इतिहास घडवला होता. या मैदानावर भारताने आजवरचा पहिला कसोटी विजय मिळवला होता. आता अशीच कामगिरी भारताला मँचेस्टरच्या ‘ओल्ड ट्रॅफर्ड’ मैदानावरही करावी लागणार आहे.

– भारतीय संघाला ‘ओल्ड ट्रॅफर्ड’वर अद्याप एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही. या मैदानावरील नऊपैकी चार कसोटी सामन्यांत भारतीय संघ पराभूत झाला असून पाच सामने अनिर्णित राहिले आहेत.

– यजमान इंग्लंडने मात्र या मैदानावर उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ‘ओल्ड ट्रॅफर्ड’वर गेल्या २५ वर्षांत इंग्लंडने एकूण २० कसोटी सामने खेळले असून यापैकी १४ जिंकले आहेत. चार सामने अनिर्णित राहिले, तर केवळ दोनमध्ये इंग्लंडने हार पत्करली आहे.

पंतचा यष्टिरक्षणाचा सराव

मँचेस्टर कसोटीत भारतीय संघासाठी यष्टिरक्षण कोण करणार, हा मोठा प्रश्न आहे. भारताचा पहिल्या पसंतीचा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतच्या बोटाला दुखापत आहे. त्यामुळे त्याला केवळ फलंदाज म्हणून खेळविण्याबाबत भारतीय संघ विचार करत असल्याची चर्चा आहे. मात्र, भारतीय संघाचे सोमवारी सराव सत्र झाले, ज्यात पंतने यष्टिरक्षणाचा सराव केला. त्यामुळे त्याच्याकडेच यष्टिरक्षणाची जबाबदारी राहण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

इंजिनियर, लॉइड यांचा सन्मान

भारताचे माजी यष्टिरक्षक-फलंदाज फरुख इंजिनियर आणि वेस्ट इंडिजचे विश्वचषक विजेते कर्णधार क्लाइव्ह लॉइड यांचा लँकशायर कौंटी क्लबतर्फे विशेष सन्मान केला जाणार आहे. लँकशायरचे घरचे मैदान असलेल्या मँचेस्टरच्या ‘ओल्ड ट्रॅफर्ड’ स्टेडियममधील स्टँडला इंजिनियर आणि लाइड यांचे नाव देण्यात येईल. याचे अनावरण भारत-इंग्लंड कसोटीदरम्यान केले जाणार आहे. या दोघांनीही अनेक वर्षे लँकशायर क्लबचे प्रतिनिधित्व केले. इंजिनियर यांनी या क्लबकडून १९६८ ते १९७६ या कालावधीत एकूण १७५ सामने खेळताना ५९४२ धावा केल्या, तसेच यष्टींमागे ४२९ झेल पकडले. त्यांनी ३५ फलंदाजांना यष्टिचीतही केले होते.