Shubman Gill Won ICC Player Of The Month Award For Fourth Time: भारताचा कसोटी कर्णधार शुभमन गिलला मंगळवारी (१२ ऑगस्ट) जुलै महिन्यासाठी आयसीसीचा महिन्यातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले. गिलने इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील जुलैमध्ये झालेल्या तीन सामन्यांमध्ये ९४.५० च्या सरासरीने ५६७ धावा केल्या होत्या.
याचबरोबर तो चौथ्यांदा आयसीसीचा महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जिंकणारा पहिला पुरुष खेळाडू ठरला. यापूर्वी, जानेवारी २०२३, सप्टेंबर २०२३ आणि फेब्रुवारी २०२५ मध्ये गिलला आयसीसीचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले होते. महिला क्रिकेटमध्ये, अॅश गार्डनर आणि हेली मॅथ्यूज यांनी प्रत्येकी चार वेळा हा पुरस्कार जिंकला आहे.
इंग्लंडविरुद्ध बर्मिंगहॅम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात गिलने ४३० धावा केल्या होत्या. एकाच कसोटी सामन्यातील ही दुसरी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या होती. त्या कसोटी सामन्यात त्याच्या २६९ आणि १६१ धावांच्या खेळींमुळे मालिका १-१ अशी बरोबरीत आली. मँचेस्टर येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात त्याने १०३ धावांची उपयुक्त खेळी खेळून सामना अनिर्णित राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
गिल व्यतिरिक्त, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू वियान मुल्डर जुलैमध्ये महिन्याचा सर्वोत्तम खेळाडू होण्याच्या शर्यतीत होते. चौथ्यांदा महिन्याचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झाल्यानंतर गिल म्हणाला, “जुलैसाठी आयसीसीचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झाल्याने मी खूप आनंदी आहे. यावेळी हा आनंद आणखी जास्त आहे कारण कर्णधार म्हणून माझ्या पहिल्या कसोटी मालिकेतील कामगिरीसाठी मला हा पुरस्कार मिळाला आहे.”
गिल पुढे म्हणाला की, “बर्मिंगहॅममध्ये झळकवलेले द्विशतक माझ्यासाठी नेहमीच संस्मरणीय राहील. हा माझ्या इंग्लंड दौऱ्यातील सर्वात संस्मरणीय क्षणांपैकी एक असेल. इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका कर्णधार म्हणून माझ्यासाठी शिकण्याचा अनुभव होता आणि दोन्ही संघांनी उत्कृष्ट कामगिरी केली.”
इंग्लंडची फलंदाज सोफिया डंकलीला जुलै २०२५ साठी आयसीसीची सर्वोत्तम महिला खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले आहे. या शर्यतीत डंकलीने तिची सहकारी सोफी एक्लेस्टोन आणि आयर्लंडची कर्णधार गॅबी लुईस यांना मागे टाकले. जुलैमध्ये तिने एकदिवसीय आणि टी-२० दोन्ही सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली.