Shubman Gill- Tevin Imlach Collision Video: भारत आणि वेस्टइंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा थरार दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियममध्ये सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिलने पहिल्यांदाच नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय सार्थ ठरवत भारतीय संघाने पहिल्याच दिवशी २ गडी बाद ३१८ धावांचा डोंगर उभारला आहे. यशस्वी जैस्वाल १७३ धावांवर नाबाद आहे. तर कर्णधार शुबमन गिल २० धावांवर नाबाद आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी मिळाल्यापासून गिलला एकदाही नाणेफेक जिंकता आलं नव्हतं. वेस्टइंडिजविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीदरम्यान नाणेफेकीचा कौल भारतीय संघाच्या बाजूने लागला आणि भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून डावाची सुरूवात करण्यासाठी आलेल्या केएल राहुल आणि यशस्वी जैस्वालने पहिल्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी केली. केएल राहुल ३८ धावा करत माघारी परतला. त्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन यांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी १९३ धावांची भागीदारी केली. जैस्वालने आपलं शतक पूर्ण केलं. तर साई सुदर्शन आपलं पहिलं शतक पूर्ण करण्यापासून १३ धावा दूर राहिला. तो ८७ धावांवर बाद होऊन माघारी परतला.

शुबमन गिल- टेविन इमलॅच यांच्यात जोरदार धडक

साई सुदर्शन बाद होऊन माघारी परतल्यानंतर कर्णधार शुबमन गिल फलंदाजीला आला. गिल आणि जैस्वाल स्ट्राईकवर असताना ८५ वे षटक टाकण्यासाठी अँडरसन फिलिप गोलंदाजीला आला. या षटकातील पाचवा चेंडू यशस्वी जैस्वालने मिडविकेटच्या दिशेने ढकलला. त्यावेळी क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला आणि वेगाने यष्टिरक्षकाच्या दिशेने फेकला. त्यावेळी शुबमन गिल आणि यष्टिरक्षक यांच्यात जोरदार धडक झाली.

ही धडक इतकी जोरदार होती की, गिल आणि टेविन इमलॅच दोघेही पडले. त्यामुळे फिजिओला मैदानावर यावं लागलं आणि सामना काही मिनिटे थांबवण्यात आला होता. त्यावेळी यशस्वी जैस्वाल गिलची फिरकी घेताना दिसला. तो गिल बोटं दाखवताना दिसून आला. हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.