SL vs AUS Australia break Indias record most wins in WTC : डब्ल्यूटीसी २०२३-२५ स्पर्धेच्या इतिहासात ऑस्ट्रेलियन संघाचे वर्चस्व श्रीलंकेतही दिसून आले, ज्यामध्ये त्यांनी स्टीव्हन स्मिथच्या नेतृत्वाखाली २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत क्लीन स्वीप केले आणि वर्ल्ड टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात टीम इंडियाचा एक मोठा विक्रमही मोडला. या कसोटी मालिकेतील दोन्ही सामने गॅले स्टेडियमवर खेळले गेले, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियन संघाने पहिला सामना एक डाव आणि २४२ ​​धावांनी जिंकला तर दुसरा सामना ९ विकेट्सने जिंकण्यात यशस्वी झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑस्ट्रेलियाने मोडला भारताचा विक्रम –

ऑस्ट्रेलियन संघाने जून महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०२३-२५ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. त्याआधी त्यांनी भारतीय संघाचा जागतिक कसोटी सामन्याच्या चक्रात सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम मोडला आहे. २०१९-२१ मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत टीम इंडियाने एकूण १२ सामने जिंकले होते, तर ऑस्ट्रेलियन संघाने आता २०२३-२५ च्या जागतिक कसोटी स्पर्धेत एकूण १३ सामने जिंकून टीम इंडियाचा हा विक्रम मोडला आहे. या डब्ल्यूटीसी सायकलमध्ये ऑस्ट्रेलियाची श्रीलंकेविरुद्धची ही शेवटची द्विपक्षीय मालिका होती.

ऑस्ट्रेलियाने १४ वर्षांनंतर श्रीलंकेत मालिका जिंकली –

गॅले स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्धचा दुसरा कसोटी सामना ९ विकेट्सने जिंकून, ऑस्ट्रेलियन संघाने १४ वर्षांनंतर श्रीलंकेत कसोटी मालिका जिंकण्यात यश मिळवले. या मालिकेत, कांगारू संघाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि उस्मान ख्वाजाची फलंदाजीत तर मॅथ्यू कुहनेमन आणि नॅथन लायनची गोलंदाजीत चमक दिसून आली. आता कांगारू संघाला श्रीलंकेत २ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे आणि त्यानंतर ते २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होण्यासाठी जातील.

स्टीव्हन स्मिथने केली जॅक कॅलिसच्या विक्रमाची बरोबरी –

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी स्लिपमध्ये कुसल मेंडिसला झेल घेऊन स्टीव्हन स्मिथने २०० झेल पूर्ण केले. या बाबतीत, स्मिथने दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज खेळाडू जॅक कॅलिसच्या विक्रमाची बरोबरी केली, ज्यामध्ये त्याने क्षेत्ररक्षक म्हणून कसोटीत २०० झेल घेतले होते. स्मिथच्या आधी, कसोटी क्रिकेटमध्ये नॉन-यष्टिरक्षक म्हणून फक्त चार खेळाडूंनी २०० किंवा त्याहून अधिक झेल घेतले आहेत. या यादीत सर्वात वरच्या क्रमांकावर राहुल द्रविड आहे, ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये एकूण २१० झेल घेतले आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sl vs aus australia breaks india record for most wins in a single season of world test championship vbm