Smriti Mandhana Palash Muchhal: भारतीय महिला संघ आज १९ ऑक्टोबरला वनडे वर्ल्डकप २०२५ मधील इंग्लंडविरूद्धचा सामना खेळत आहे. चांगली सुरूवात केल्यानंतर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरूद्धचे सामने गमावले आहेत. त्यानंतर आता इंग्लंडविरूद्ध सामना खेळण्यासाठी टीम इंडिया उतरली आहे. यादरम्यान स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडने त्यांच्या लग्नाची घोषणा केली आहे.
कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न करत आहे. पण यादरम्यान आता स्मृती मानधनाच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. टीम इंडियाची उपकर्णधार स्मृती मानधना लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
टीम इंडियाप्रमाणेच, उपकर्णधार आणि अनुभवी सलामीवीर स्मृती मानधना महिला विश्वचषकात अद्याप पूर्ण फॉर्मात दिसलेली नाही. पण, तिने ऑस्ट्रेलियाविरूद्ध सामन्यात चांगली फलंदाजी करत फॉर्मात परतल्याची झलक दाखवली आहे. ज्यामुळे आगामी सामन्यांमध्ये तिच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे. विशेषतः इंदूरमध्ये होत असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात, तिच्या बॅटमधून मोठी खेळी पाहण्याची अपेक्षा करतील, कारण मानधना आता लवकरची इंदोरची सून होणार आहे.
स्मृतीचा प्रियकर आणि संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छलने इंदूरमध्ये भारत-इंग्लंड महिला विश्वचषक सामन्यापूर्वी हा खुलासा केला. स्मृती आणि पलाश गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांनीही सोशल मीडियावरील पोस्टमधून रिलेशनशिपमध्ये असल्याचे अनेकदा दाखवून दिलं आहे. पण आजपर्यंत कधीच त्यांच्या लग्नाची चर्चा झाली नव्हती, पण आता पलाशच्या वक्तव्याने हे दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे.
स्मृतीसोबतच्या त्याच्या नात्याबद्दल विचारले असता, पलाश मुच्छलने उघडपणे सांगितलं की, “ती लवकरच इंदूरची सून होणार आहे. मी आता एवढेच म्हणेन. मी तुम्हाला आता हेडलाईन दिली आहे.”
३० वर्षीय पलाश मुच्छल हा इंदूरचा आहे आणि त्याच्या मोठ्या बहिणीप्रमाणे तो बॉलिवूड संगीत उद्योगात कार्यरत आहे. महाराष्ट्रातील सांगली येथील २९ वर्षीय स्मृती मानधना गेल्या दशकाहून अधिक काळ भारतीय महिला संघाची प्रमुख सदस्य आहे.
स्मृती मानधनासह लग्नाच्या घोषणेबरोबरच, पलाश मुच्छलचा ‘राजू बाजेवाला’ या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे, ज्यामध्ये अविका गोर आणि चंदन रॉय हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. मुच्छल हा त्यांची बहीण पलक मुच्छलसह अनेक बॉलिवूड चित्रपटांसाठी संगीत देण्यासाठी ओळखला जातो.