India And New zealand Semi Final Qualification Scenario: आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेत भारतीय संघाला इंग्लंडकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. रविवारी झालेल्या सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवण्याची सुवर्णसंधी होती. पण भारतीय संघाच्या हातून थोडक्यात हा सामना थोडक्यात निसटला. भारतीय संघाकडून धावांचा पाठलाग करताना स्मृती मान्धनाने ८८ धावांची खेळी केली. तर कर्णधार हरमनप्रीत कौरने ७० धावा केल्या. हा सामना जिंकून इंग्लंडने सेमीफायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. मात्र भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांना अजूनही सेमीफायनलमध्ये जाण्याची संधी असणार आहे. कसं असेल दोन्ही संघांसाठी समीकरण? जाणून घ्या.
भारतीय संघासाठी कसं असेल समीकरण?
आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेसाठी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या ३ संघांनी सेमीफायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. आता एका स्थानासाठी २ संघांमध्ये लढत सुरू आहे. भारतीय संघाने सुरुवातीचे २ सामने जिंकले. त्यानंतर पुढील तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. जर भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर पुढील दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागणार आहे.
भारतीय संघाचे पुढील २ सामने न्यूझीलंड बांगलादेशविरुद्ध होणार आहे. जर भारताने हे दोन्ही सामने जिंकले तर ८ गुणांसह भारतीय संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करू शकतो. पण जर भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला.
तर बांगलादेशला पराभूत करूनही भारतीय संघाला न्यूझीलंड विरूद्ध इंग्लंड यांच्यातील सामन्याच्या निकालावर अवलंबून राहावं लागणार आहे. जर इंग्लंडने न्यूझीलंडला पराभूत केलं तर भारतीय संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. पण जर न्यूझीलंडला हरवलं आणि बांगलादेशकडून भारताचा पराभव झाला, तर भारतीय संघाचा नेट रनरेट हा बांगलादेशपेक्षा जास्त असणं गरजेचं असणार आहे.
न्यूझीलंड संघासाठी कसं असेल सेमीफायनलमध्ये जाण्याचं समीकरण?
इंग्लंडने भारतीय संघाला पराभूत केल्यामुळे न्यूझीलंडचं काम सोपं झालं आहे. पण भारतीय संघाविरुद्ध होणारा सामना हा न्यूझीलंडसाठी देखील महत्वाचा असणार आहे. न्यूझीलंडचे पुढील दोन सामने भारत आणि इंग्लंडविरुद्ध होणार आहे. जर हे दोन्ही सामने न्यूझीलंडने जिंकले तर न्यूझीलंडचा संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करू शकतो. जर भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव झाला, तर न्यूझीलंडचा प्रवास इथेच संपेल.
पण भारतीय संघाला पराभूत करून इंग्लंडकडून पराभव झाला, तरीदेखील न्यूझीलंडकडे सेमीफायनलमध्ये जाण्याची संधी असणार आहे. त्यासाठी श्रीलंकेने बांगलादेशला आणि बांगलादेशने भारतीय संघाला पराभूत करणं गरजेचं असणार आहे. असं झाल्यास न्यूझीलंडचा संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करू शकतो.