वृत्तसंस्था, नवी दिल्ली

आशियाई आणि राष्ट्रकुलसारख्या प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे यजमानपद भूषविलेले राजधानी नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियम आता नामशेष होणार असून, त्या जागी सर्व अत्याधुनिक सुविधांसह एक सुसज्ज क्रीडानगरी उभारण्याचा प्रस्ताव क्रीडा मंत्रालयाने ठेवला आहे. विशेष म्हणजे, २०१०च्या राष्ट्रकुल स्पर्धेपूर्वी तब्बल ९६१ कोटी रुपयांचा खर्च करून या स्टेडियमचे नूतनीकरण करण्यात आले होते.

नेहरू स्टेडियम १०२ एकर जागेत उभे आहे. या परिसरात अनेक क्रीडामैदानांसह राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्था (नाडा), राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळा (एनडीटीएल),  भारतीय क्रीडा प्राधिकरण (साइ), खेलो इंडिया आणि प्राप्तिकर विभागाचे कार्यालय आहे. आता या संपूर्ण परिसरात नवीन क्रीडानगरी उभी राहणार आहे. मात्र, सध्या ही योजना केवळ एक प्रस्ताव म्हणून सादर करण्यात आली आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर प्रकल्पाला लागणारा अवधी आणि अंदाजे खर्च निश्चित करण्यात येईल, अशी माहितीही मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.

जागेचा वापर योग्यरीत्या होत नाही. त्यामुळेच स्टेडियमचा कायापालट करण्याचा विचार आहे. या जागी उभ्या राहणाऱ्या क्रीडानगरीत सर्व खेळांच्या सुविधा उपलब्ध असतील. खेळाडूंच्या निवासासाठीही येथे व्यवस्था केली जाणार आहे. या खेरीज मनोरंजनासाठी एक भाग राखीव ठेवण्यात येईल, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले. क्रीडानगरीच्या प्रकल्पासाठी नगरविकास मंत्रालयासह अनेक मंत्रालय आणि विभागांमध्ये समन्वय आवश्यक असल्याने इतक्या तातडीने योजनेला सुरुवात होणार नाही असेही मानले जात आहे.

क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांनी अलीकडेच दोहा येथील क्रीडानगरीला भेट दिली होती. ऑस्ट्रेलियातील क्रीडानगरीबाबतही त्यांनी माहिती घेतली होती. त्या धर्तीवर भारतातही क्रीडानगरी उभारण्याचा क्रीडा मंत्रालयाचा मानस आहे. सध्या भारतात अहमदाबाद येथे सरदार वल्लभभाई पटेल क्रीडा संकुलाची निर्मिती केली आहे. हे संकुल २५० एकर जागेत वसलेले असून, यासाठी ४६०० कोटी रुपये खर्च आला आहे. विशेष म्हणजे २०३६ ऑलिम्पिक आणि २०३० राष्ट्रकुल स्पर्धेसाठी याच शहराचे यजमान म्हणून नाव देण्यात आले आहे.

अन्य कार्यक्रमांचेच आयोजन

मैदानाच्या देखभालीच्या खर्चाचे कारण पुढे करत खेळांखेरीज अन्य व्यावसायिक कारणांसाठी विशेषत: संगीत रजनीसाठी मैदानाचा उपयोग केला जाऊ लागला. यामुळे आयोजकांवर आणि व्यवस्थापनावर बरीच टीका करण्यात आली. मैदानाची मालकी क्रीडा प्राधिकरणाकडे असून, यावर मार्ग काढण्यासाठी त्यांनी अशा कार्यक्रमांसाठीच्या मूल्यात वाढ केली. तसेच अशा कार्यक्रमानंतर मैदान चांगल्या स्थितीत परत न केल्यास दंड आकारण्यास सुरुवात केली. तेव्हापासून मैदानाचा वापर मर्यादित राहिला.

स्टेडियमबाबत…

नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियम १९८२ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी तयार करण्यात आले. त्यानंतर २०१० मधील राष्ट्रकुल स्पर्धेपूर्वी ९६१ कोटी रुपये खर्च करून याचे नूतनीकरण करण्यात आले.

अलीकडेच येथे जागतिक पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘आयसीसी’ने तांत्रिक कारणामुळे अयोग्य ठरविण्यापूर्वी येथे काही एकदिवसीय क्रिकेट सामन्यांचेही आयोजन करण्यात आले होते.