ऑस्ट्रेलियाच्या विजयात फिंच चमकला
कॅनबेरा : सलामीवीर आरोन फिंचच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ७३ धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ३२९ धावांची मजल मारली. फिंचने ९ चौकार आणि ३ षटकारांसह १०९ धावांची खेळी केली. डेव्हिड वॉर्नरने ५३ तर स्टीव्हन स्मिथने ७३ धावा करत फिंचला चांगली साथ दिली. प्रत्युत्तरादाखल खेळताना दक्षिण आफ्रिकेचा डाव २५६ धावांतच आटोपला. हशीम अमलाची १०२ धावांची खेळी व्यर्थ ठरली. मिचेल स्टार्कने ४ तर जोश हेझलवूडने ३ बळी घेतले. स्टीव्हन स्मिथला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.

न्यूझीलंडविरुद्ध पाकिस्तानची संथ सुरुवात
दुबई : अझर अली आणि युनुस खान यांच्या चिवट अर्धशतकांच्या बळावर पाकिस्तानने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत संथ वाटचाल केली. २ बाद ३४ वरुन पुढे खेळणाऱ्या पाकिस्तानच्या डावाला अझर-युनुस जोडीने आकार दिला. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी केली. अझर ७५ तर युनुस ७२ धावांवर बाद झाला. मिसबाह उल हक २८ धावा करुन तंबूत परतला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पाकिस्तानच्या ६ बाद २८१ धावा झाल्या आहेत. पाकिस्तानचा संघ अजूनही १२२ पिछाडीवर आहे. सर्फराझ अहमद २८ तर यासिर शाह १ धावांवर खेळत आहेत.

मुंबईचा दिल्लीवर विजय
राजकोट : वासीम जाफरच्या नाबाद ८३ धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबईने विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत दिल्लीवर ६ विकेट्सनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीचा डाव १५७ धावांतच गडगडला. शार्दुल ठाकूरने सर्वाधिक ३ बळी घेतले. गौतम गंभीरला २२ तर वीरेंद्र सेहवागला ९ धावाच करता आल्या. मिलिंद कुमारने सर्वाधिक ६४ धावा केल्या. मुंबईने ४ विकेट्सच्या मोबदल्यात हे लक्ष्य गाठले. जाफरने ११ चौकार आणि एका षटकारासह ८३ धावा केल्या.

हॅरिस शिल्ड क्रिकेट : उर्विल शाहचे शतक
मुंबई : एमएसएसए-मुंबई इंडियन्सतर्फे आयोजित वार्षिक आंतरशालेय हॅरिस शिल्ड क्रिकेट स्पर्धेत उर्विल शाहच्या शतकाच्या जोरावर रायन इंटरनॅशनल आयसीएसई (मालाड) संघाने सेंट जोसेफ (मालाड) संघावर मात केली. रायन संघाने २३२ धावांची मजल मारली. सेंट जोसेफ संघाचा १८१ धावांतच आटोपला. अंजुमन इस्लाम (फोर्ट) संघाने ३०२ धावा केल्या. ऑक्सफर्ड पब्लिक स्कूल (कांदिवली) संघाचा डाव ६९ धावांतच गडगडला. अंजुमनच्या मुशीर खानने ३४ धावांत ५ बळी घेतले. सक्षम पराशरच्या पाच बळींच्या बळावर स्वामी विवेकानंद (बोरिवली) संघाने गोकुळधाम (गोरगाव) संघाला नमवले. यशोधाम (गोरेगाव) संघाने अवर लेडी ऑफ रेमेडी (कांदिवली) संघाने दिलेले ११४ धावांचे लक्ष्य ४ विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले.

सुरेश रैना ‘स्वच्छ भारत’ अभियानात सहभागी
गाझियाबाद : भारताचा मधल्या फळीतील फलंदाज सुरेश रैना स्वच्छ भारत अभियानात सहभागी झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अभियानासाठी रैनाच्या नावाची शिफारस केली होती. रैनाने लहान मुलांच्या साथीने परिसराची स्वच्छता केली. स्वच्छता केवळ कागदावर असू नये, ती प्रत्यक्षात साकारली जावी. पंतप्रधानांच्या या अभियानात सहभागी व्हायला मिळाले याचा अभिमान आहे. प्रत्येक नागरिकाने सभोवताल स्वच्छ राखण्यासाठी प्रयत्न करावेत असे रैनाने सांगितले.

क्रिकेट : डीसीबी, बीएमसी विजयी
मुंबई : कॅपिटल ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत डेव्हलपमेंट क्रेडिट बँक, बीएमसी यांनी विजयी आगेकूच केली. एचडी मीडियाने ११४ धावा केल्या. डीसीबी संघाने राकेश शर्माच्या ४७ धावांच्या बळावर ६ विकेट्स राखून हे लक्ष्य पूर्ण केले. ठाणे शहर पोलिसांचा डाव ७९ धावांत आटोपला. बृहन्मुंबई महानगर पालिका संघाने किशोर पाटेकरच्या ३८ धावांच्या जोरावर हे लक्ष्य गाठले.

स्नूकर : पंकजची विजयी सलामी
बंगळुरू : बंगळुरू येथे सुरू असलेल्या जागतिक स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत विश्वविजेत्या पंकज अडवाणीने विजयी सलामी दिली. पंकजने मलेशियाच्या कीन हो मोहवर ४-२ अशी मात केली.महिलांमध्ये राष्ट्रीय विजेती विद्या पिल्लेने रशियाच्या अनास्तासिजा सिनगुरिंडीचा ३-० असा धुव्वा उडवला.

स्नूकर : निमीष कुलकर्णी अजिंक्य
मुंबई : मलबार हिल क्लब आयोजित राज्य स्नूकर स्पर्धेत पुण्याच्या निमीष कुलकर्णीने कनिष्ठ जेतेपदावर नाव कोरले. निमीषने धैर्य भंडारीवर ५९-१४, ६८-४२, ५९-१६ अशी मात केली.

फुटबॉल : श्राह, डेनिसची हॅट्ट्रिक
मुंबई : एमएसएसए-मुंबई इंडियन्सतर्फे आयोजित वार्षिक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत श्राह अरोरा आणि डेनिस परेराच्या प्रत्येकी ३ गोलांच्या जोरावर बॉम्बे स्कॉटिश (माहिम) संघाने १४ वर्षांखालील मुलींच्या गटात आरएसबी आर्य मंदिर (जुहू) संघाचा ६-० असा धुव्वा उडवला. या विजयासह बॉम्बे स्कॉटिशने अंतिम फेरीत आगेकूच केली. अन्य लढतीत मेरी इम्यॅक्युेट (बोरिवली) संघाने द कॅथ्रेडल एण्ड जॉन कॅनन संघाचा १-० असा पराभव केला.

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा
पुणे : उत्कर्ष क्रीडा मंडळाच्या वतीने गंगाराम मिटकर स्मृती चषक पुरुष आणि व्यावसायिक गटाच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भिवंडी येथील अरिहंत कंपाऊंड, बिल्डिंग क्रमांक ५५ च्या पटांगणात हे सामने रंगणार आहेत. एअर इंडिया, महिंद्रा, बँक ऑफ इंडिया, आरसीएफ, मुंबई पोलिस असे अव्वल संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

मावळी मंडळातर्फे जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा
मुंबई : मावळी मंडळ, ठाणेतर्फे जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ६१व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी या स्पर्धेद्वारे संघ निवडण्यात येणार आहे. १० ते १८ डिसेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या संघांनी ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनला संलग्न संस्थांनी प्रवेश अर्ज जिल्हा असोसिएशनच्या कार्यालयातून ४ डिसेंबपर्यंत भरून द्यावेत.

फुटबॉल : उदया एससीचा विजय
मुंबई : कर्नाटक स्र्पोटिंग असोसिएशनतर्फे आयोजित आठव्या ए.आर. कुडरोली स्मृती फुटबॉल स्पर्धेत उदया एससीने मंगलोर ब्ल्यूज संघावर १-० अशी मात केली. जयेश नाईकने एकमेव गोल केला.

पिंकी, मोनिका पराभूत
पीटीआय, जेजू (कोरिया)
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक मिळविणाऱ्या पिंकी राणी (५१ किलो) व मोनिका सौन (७५ किलो) यांचे जागतिक बॉक्सिंग स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
मेरी कोमऐवजी संधी मिळालेल्या पिंकी हिला रशियाच्या सेनिना सागतेवा हिने हरविले. पिंकीने सेनिनाला चांगली लढत दिली. तिने दोन मिनिटांच्या पहिल्या फेरीत जोरदार ठोसे मारून सेनिना हिला हैराण केले मात्र दुसऱ्या फेरीत तिची दमछाक झाली. नंतर तिचा प्रभाव जाणवला नाही. मोनिका हिला पहिल्याच फेरीत चीनच्या लिऊ क्वियानचे आव्हान होते. लिऊ हिने एकतर्फी लढतीत मोनिका हिच्यावर सहज मात केली.

भारतीय महिला क्रिकेट संघ विजयी
पीटीआय, म्हैसूर
थिरुश कामिनी, पूनम राऊत आणि हरमनप्रीत कौर यांच्या दिमाखदार प्रदर्शनाच्या आधारे भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकमेव कसोटीत एक डाव आणि ३४ धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद ४०० धावांवर आपला डाव घोषित केला. कामिनीने १९२ तर पूनम राऊतने १३० धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव २३४ धावांत आटोपला. मिगनॉन डि प्रूझने १०२ धावांची एकाकी झुंज दिली. हरमनप्रीत कौरने ५ तर राजेश्वरी गायकवाडने ४ बळी घेतले. फॉलोऑन मिळाल्यानंतर दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेचा डाव १३२ धावांतच संपुष्टात आला. त्रिशा चेट्टीने सर्वाधिक ३५ धावा केल्या. हरमनप्रीतने ४ बळी घेतले.