बंगळूरु : ‘फिफा’कडून भारतीय फुटबॉल महासंघावर (एआयएफएफ) बंदी येण्याची शक्यता निर्माण झाली असली, तरी तुम्ही याकडे फारसे लक्ष देऊ नका, अशी सूचना भारतीय संघाचा तारांकित आघाडीपटू सुनील छेत्रीने आपल्या सहकाऱ्यांना केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाहेरील व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे ‘एआयएफएफ’वर जागतिक फुटबॉल संघटनेने (फिफा) नाराजी व्यक्त करतानाच त्यांच्यावर बंदी घालण्याची ताकीद दिली आहे. तसेच ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या कुमारी (१७ वर्षांखालील) विश्वचषकाचे यजमानपदही भारताकडून काढून घेण्याची चेतावनीही ‘फिफा’ने दिली आहे. त्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने ३ ऑगस्टला ‘एआयएफएफ’च्या कार्यकारिणी समितीसाठी निवडणुकीचे आदेश दिले होते. त्यानुसार, सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीने निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली असून निवडणुका २८ ऑगस्टला घेतल्या जाणार आहेत.

‘‘मी भारतीय संघातील माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा केली आहे. तुमच्या नियंत्रणाबाहेरील गोष्टींकडे तुम्ही फार लक्ष देऊ नका, अशी मी त्यांना सूचना केली आहे. महासंघाशी निगडित व्यक्ती सध्याच्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. खेळाडू म्हणून आम्ही केवळ मैदानावरील कामगिरीवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. खेळाडू म्हणून स्वत:मध्ये सुधारणा करण्यावर आमचा भर असला पाहिजे. तसेच संधी मिळेल तेव्हा देश किंवा क्लबकडून सर्वोत्तम खेळ करण्याचा आमचा प्रयत्न असला पाहिजे,’’ असे छेत्री म्हणाला.

भारताला यजमानपद लाभलेली ‘फिफा’ कुमारी विश्वचषक स्पर्धा ११ ते ३० ऑक्टोबर या कालावधी खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेचे सामने मुंबई, गोवा आणि भुवनेश्वर येथे खेळवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या महिन्यात मान्यता दिली होती. मात्र, आता भारताचे यजमानपद येण्याची चिन्हे आहेत. 

भारतातील यंदाच्या फुटबॉल हंगामाला डय़ुरँड चषक स्पर्धेने सुरुवात (१६ ऑगस्ट) होणार असून दुसऱ्या दिवशी छेत्रीच्या एफसी बंगळूरु संघाचा जमशेदपूर एफसी संघाशी सामना होईल. १३१ वर्षांपासून सुरू असलेल्या या स्पर्धेत खेळण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे छेत्रीने नमूद केले.

दत्ता, मिंग यांचे अर्ज फेटाळले

सुब्रता दत्ता आणि लार्सिग मिंग यांनी ‘एआयएफएफ’मधील पदांसाठी केलेले अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळून लावले आहेत. निवडणूक लढवण्यासाठी आवश्यक पात्रता निकष पूर्ण न केल्यामुळे या दोघांनाही अपात्र ठरवण्यात आले आहे, असे ‘एआयएफएफ’मधील सूत्रांकडून सांगण्यात आले. दत्ता आणि मिंग हे दोघेही तीन वेळा कार्यकारी समितीवर निवडून आले होते. त्यामुळे राष्ट्रीय क्रीडा संहितेनुसार, त्यांना पुढील चार वर्षे कोणतेही पद भूषवता येणार नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil chhetri advises teammates not give too much attention to fifa ban threat zws
First published on: 15-08-2022 at 03:27 IST