Sunil Gavaskar Reaction on Rohit Sharma Captaincy Snub: भारतीय संघ ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणाऱ्या वनडे मालिकेची आतुरतेने वाट पाहत होते. या मालिकेसाठी टीम इंडियाचे दिग्गज रोहित-विराट पुन्हा एकदा मैदानावर खेळताना दिसणार होते. रोहितचं नेतृत्त्व, विराटची फलंदाजी अन् संपूर्ण संघाची कामगिरी यासाठी चाहते उत्सुक होते. पण संघ जाहीर करताना मात्र रोहित शर्माच्या जागी शुबमन गिलला वनडे संघाचं कर्णधारपद देण्यात आलं.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढून टाकण्याच्या निर्णयावर माजी भारतीय फलंदाज सुनील गावस्कर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. गावस्कर म्हणाले की निवड समितीने योग्य निर्णय घेतला आहे, परंतु हा निर्णयामुळे आणखी काही वाईट बातम्याही येऊ शकतात, असा इशाराही त्यांनी दिला.

गावस्कर स्पोर्ट्स तकशी बोलताना म्हणाले की,”रोहित शर्मा २०२७ च्या वर्ल्ड कपसाठी तयार असेल की नाही, हे अजून सांगता येत नाही. तो आता फक्त वनडे सामने खेळतोय आणि जर आपण आंतरराष्ट्रीय कॅलेंडर पाहिलं, तर भारताचा संघ फारसे वनडे सामने खेळत नाही. बहुतेक द्विपक्षीय मालिकांमध्ये कसोटी आणि टी-२० सामने आहेत. जर तो वर्षाला फक्त ५ ते ७ वनडे खेळला, तर त्याला तशी सरावाची संधी मिळणार नाही, जी विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेसाठी आवश्यक असते. त्यामुळे त्याची संघातील जागा निश्चित नसल्यास, शुबमन गिलला तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.”

“वैयक्तिक पातळीवर रोहित शर्माने खूप काही साध्य केलं आहे. त्याने भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी आणि त्याआधी टी-२० विश्वचषक जिंकून दिला. त्याच्या नेतृत्वाबद्दल कोणतीच शंका नाही. पण स्वतः रोहितलाही या निर्णयाशी सहमती आहे, कारण जर पुढील दोन वर्षांचा विचार करायचा असेल, तर एका तरुण कर्णधाराला आतापासून तयार करावं लागतं. आणि ह्याच विचारसरणीवर निवड समितीने पुढे पाऊल टाकलं,” असंही गावस्कर म्हणाले.

“जर तुम्ही स्पष्टपणे सांगू शकत नसाल की पुढील दोन वर्षांसाठी तयार आहात की नाही, म्हणजेच तुम्ही अनिश्चित आहात, तर मग अशा निर्णयांसाठी तयार राहावं लागतं. त्यांनाही (रोहित-विराटलाही) माहिती आहे की ते फक्त एकदिवसीय सामने खेळणार असतील, तर ते खूपच कमी आहेत. त्यामुळे त्यांना अधिक सरावाची गरज आहे आणि विजय हजारे ट्रॉफीसारख्या स्पर्धांमध्ये खेळायला हवं. बहुधा ह्याच कारणामुळे निवड समितीने हा निर्णय घेतला आहे,” अशी माहिती गावस्करांनी दिली.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीची निवड करण्यात आली आहे. १९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या मालिकेत दोन्ही खेळाडू आयपीएल २०२५ नंतर पहिल्यांदाच खेळताना दिसतील.