Team India ODI Captaincy: भारतीय संघात गेल्या काही महिन्यात मोठे बदल झाले आहेत. रोहित शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर ही जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली. त्यानंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर ही जबाबदारी युवा फलंदाज शुबमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. दरम्यान रोहित वनडे क्रिकेटलाही रामराम करू शकतो. रोहितने वनडेतून निवृत्ती जाहीर केल्यानंतर वनडे संघाचा कर्णधार कोण होणार? अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने कर्णधारपदासाठी पर्याय सुचवला आहे.

रोहितनंतर श्रेयस अय्यर किंवा शुबमन गिल हा वनडे संघाच्या कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार असल्याचं अनेक दिग्गज खेळाडूंचं म्हणणं आहे. दरम्यान सुरेश रैनाच्या मते, हार्दिक पांड्या हा भारतीय वनडे संघाचा कर्णधार होऊ शकतो. भारतीय वनडे संघाच्या कर्णधारपदाबाबत बोलताना रैना म्हणाला, “गिलबाबत काय निर्णय घेतला जाईल, हे पाहणं महत्वाचं ठरेल. पण मला तरी हेच वाटतं की, हार्दिक पांड्या वनडे संघाचं नेतृत्व करताना दमदार कामगिरी करू शकतो.”

शुभंकर मिश्राला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला की, “वनडे संघाचं नेतृत्व करण्यासाठी गिलचा पर्याय देखील उपलब्ध आहे आणि तो करू शकतो.” हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्स संघाची साथ सोडल्यानंतर ही जबाबदारी शुबमन गिलकडे सोपवण्यात आली. ही जबाबदारी त्याने योग्यरित्या पार पाडली होती. गिल वनडे आणि टी -२० संघाचा उपकर्णधार देखील आहे. इंग्लंड दौऱ्याआधी गिलकडे कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे गिलला वनडे संघाचं नेतृत्व करण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे.

रोहित – विराटबद्दल काय म्हणाला?

सुरेश रैनाच्या मते, विराट आणि रोहितने २०२७ चा वर्ल्डकप खेळायला हवा. रोहित आणि विराटने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे दांडगा अनुभव असल्याचं सुरेश रैनाचं म्हणणं आहे. रोहित देशांतर्गत क्रिकेट खेळू शकतो. त्याने सरावाला सुरुवातही केली आहे. आता संघ बांधणी कशी होणार हे निवडकर्त्यांवर अवलंबून आहे.