वृत्तसंस्था, गुवाहाटी

भारताच्या अग्रमानांकित तन्वी शर्माला कनिष्ठ गटाच्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत अखेर रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात तन्वीला थायलंडच्या अन्यपत फिचितप्रीचासक हिच्याकडून ७-१५, १२-१५ असा पराभव पत्करावा लागला.

अंतिम फेरीत दोघींनी झुंजार खेळ केला. पहिल्या गेममध्ये २-२, ४-४ अशी बरोबरीनेच सुरुवातीला झाली. पण, एकवेळ अन्यपत हिचे फटके परतविण्याच्या वेगळ्या शैलीमुळे तन्वी एकाग्रता हरवून बसली. अन्यपतने तन्वीला नेटसमोर कोंडीत पकडले. अन्यपतने १०-५ अशी आघाडी मिळवली आणि ती कायम राहील याची काळजी घेतली. लागोपाठ दोन जोरकस स्मॅश आणि तन्वीचा एक फटका स्वैर गेल्यामुळे अन्यपतने पहिला गेम जिंकला.

दुसऱ्या गेममध्ये तन्वीने निर्धाराने सुरुवात करताना ६-१ अशी आघाडी मिळवली, परंतु पुन्हा तन्वीचे फटक्यांवरील नियंत्रण सुटले. तरी गेमच्या मध्याला तन्वीने ८-५ अशी आघाडी राखली. त्यानंतर अन्यपत हिने आपले नियोजन बदलले. तिने तन्वीला सातत्याने पुढे खेचण्याचा प्रयत्न केला आणि यात तन्वीचे फटक्यावरील नियंत्रण सुटले. याचा अन्यपतला फायदा झाला. अन्यपत कडक स्मॅशेसच्या जोरावर ९-८ अशी आघाडी घेतली आणि पुढे ११-८ अशी वाढवली. यानंतर दीर्घ रॅलीत तन्वीला वादग्रस्त गुण मिळाला. मात्र, नंतर पुन्हा एकदा तन्वीच्या स्वैर फटक्याने अन्यपतला विजेतेपदाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले. अन्यपतने पुन्हा एकदा स्मॅशचा सुरेख वापर करून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

सतरा वर्षांनी पदकविजेती…

तन्वीच्या रूपात भारताला १७ वर्षांनी कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत महिला गटात पदकविजेती मिळाली. यापूर्वी सायना नेहवालने २००८ मध्ये सुवर्णपदक जिंकले होते. जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी तन्वी ही भारताची तिसरी बॅडमिंटनपटू ठरली. यापूर्वी सायना आणि अपर्णा पोपट यांनी अशी कामगिरी केली होती. सायनाने २००६ मध्ये रौप्य, तर २००८ मध्ये सुवर्णपदक मिळविले होते. अपर्णा १९९६ मध्ये रौप्यपदकाची मानकरी ठरली होती.