Suryakumar Yadav Batting Form: आशिया चषक २०२५ स्पर्धेतील अंतिम फेरीत जाणारे २ संघ ठरले आहेत. बुधवारी झालेल्या सुपर ४ फेरीतील सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशवर एकतर्फी विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर गुरूवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशला पराभूत करून अंतिम फेरीत स्थान मिळवलं. तब्बल ४१ वर्षांनंतर भारत- पाकिस्तान संघ आशिया चषकातील अंतिम फेरीत भिडणार आहेत. भारतीय संघाला जेतेपद मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. पण सूर्यकुमार यादवचा फलंदाजीतील फॉर्म भारतीय संघासाठी चिंतेचं कारण ठरत आहे.
रोहित शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर, भारताच्या टी-२० संघाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली. नेतृत्वाचा दबाव असताना फलंदाजीतील फॉर्म राखून ठेवणं सोपं नसतं. संघाचं नेतृत्व करताना फलंदाजीतील फॉर्ममध्ये घसरण होणं हे काही नवीन नाही. याआधी देखील अनेक कर्णधारांच्या बाबतीत असं घडलं आहे. या रांगेत आता सूर्यकुमार यादवचा नंबर लागला आहे. काही महिन्यांपूर्वी टी-२० क्रिकेटमध्ये नंबर १ स्थानी असलेला फलंदाज आता धावा करताना संघर्ष करताना दिसून येत आहे. चिंता वाढवणारी बाब म्हणजे, सूर्याने कर्णधार म्हणून गेल्या ९ डावात अवघ्या ८७ धावा केल्या आहेत. ज्यात पाकिस्तानविरूद्ध झालेल्या सामन्यात त्याने नाबाद ४७ धावांची खेळी केली होती.
भारतीय संघाकडून तिसऱ्या- चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येणाऱ्या सूर्यकुमार यादवने पदार्पण केल्यापासून टॉप ऑर्डरची जबाबदारी योग्यरित्या पार पाडली आहे. त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६५ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. पण गेल्या ९ सामन्यांमध्ये त्याच्या फलंदाजीचा आलेख खालच्या दिशेने गेला आहे. १६५ वरून त्याचा स्ट्राईक रेट ११२ वर जाऊन पोहोचला आहे. ही भारतीय संघासाठी चिंताजनक बाब आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फ्लॉप ठरलेल्या सूर्याने आयपीएल २०२५ स्पर्धेत दमदार केली होती. मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याने १६ डावात ६५ च्या सरासरीने आणि १६७.९१ च्या स्ट्राईक रेटने ७१७ धावा केल्या होत्या. या स्पर्धेत त्याने मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेअरचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला होता.
आशिया चषक २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये होणार आहे. दोन्ही संघ तब्बल ४१ वर्षांनंतर पहिल्यांदाच अंतिम फेरीत भिडणार आहेत.हा सामना रविवारी २८ सप्टेंबरला दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये रंगणार आहे. या सामन्याआधी भारतीय संघाचा सुपर ४ फेरीतील शेवटचा सामना श्रीलंकेविरूद्ध होणार आहे. या सामन्याचा गुणतालिकेवर फार काही फरक पडणार नाही. त्यामुळे सूर्यकुमार यादवकडे या सामन्यात मोठी खेळी करून फॉर्ममध्ये परतण्याची संधी असणार आहे.