India vs Srilanka, Playing 11 Prediction: भारतीय संघाने आशिया चषक २०२५ स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारताचा संघ अंतिम फेरी गाठणारा पहिलाच संघ ठरला. तर दुसरीकडे बांगलादेशला पराभूत करून पाकिस्तानने देखील अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ ४१ वर्षांनंतर पहिल्यांदाच आशिया चषकातील अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत. या सामन्याआधी भारतीय संघाचा सुपर ४ फेरीतील शेवटचा सामना श्रीलंकेविरुद्ध रंगणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११? जाणून घ्या.

भारतीय संघाने आशिया चषक २०२५ स्पर्धेतील सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. यासह प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळवलेल्या खेळाडूंनी देखील संधीचं सोनं केलं आहे. त्यामुळे प्लेइंग ११ मधून कोणाला बाहेर करायचं हा कर्णधार सूर्यकुमार यादवसमोर मोठा प्रश्न असणार आहे.

सलामीला फलंदाजीला येणाऱ्या अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल यांनी आतापर्यंत चांगली सुरुवात करून दिली आहे. अभिषेक शर्मा हा या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. आतापर्यंत खेळलेल्या ५ सामन्यांमध्ये त्याने २४८ धावा चोपल्या आहेत. तर दुसरीकडे गिलने १११ धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकांवर कर्णधार सूर्यकुमार यादव फलंदाजीला येऊ शकतो. सूर्याला अजूनही हवा तसा फॉर्म गवसलेला नाही. त्यामुळे तो या सामन्यात मोठी खेळी करून फॉर्ममध्ये येण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

श्रीलंकेविरुद्ध होणारा सामना भारतीय संघांसाठी महत्वाचा नसणार आहे. त्यामुळे भारतीय संघात मोठे बदल पाहायला मिळू शकतात. सर्वात मोठा बदल म्हणजे जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्या जागी अर्शदीप सिंगला संधी दिली जाऊ शकते. यासह एमएस धोनीचा खास खेळाडू शिवम दुबेला देखील विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्या जागी एकही सामना खेळण्याची संधी न मिळालेल्या रिंकू सिंगला संधी दिली जाऊ शकते.

या सामन्यात अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती