आगामी विश्वचषकासाठी भारतीय संघात कोणाला जागा मिळणार याबाबतचा संभ्रम अद्याप कायम आहे. यष्टीरक्षक म्हणून महेंद्रसिंह धोनीची संघातली जागा निश्चीत असली तरीही त्याच्या फलंदाजीबाबतचं प्रश्नचिन्ह कायम आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या सामन्यात धोनीला विश्रांती देऊन भारताने युवा ऋषभ पंतला संघात जागा दिली. मात्र या सामन्यात पंतने ढिसाळ क्षेत्ररक्षण केलं. यावेळी भारताला धोनीची कमतरता जाणवली. मात्र गेल्या काही सामन्यांमध्ये धोनीच्या फलंदाजीतील कामगिरीत सातत्य जाणवत नाहीये. यासाठी त्याला टिकेचा धनीही बनावं लागलं. अशावेळी ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न धोनीच्या मदतीसाठी धावून आलाय. “धोनीवर टीका करणाऱ्यांना आपण नेमकं काय बोलतोय हेच समजत नाहीये”, अशा शब्दात वॉर्नने धोनीची पाठराखण केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“महेंद्रसिंह धोनी एक उत्तम खेळाडू आहे. ज्या जागेवर संघाला त्याची गरज आहे, तिकडे तो फलंदाजी करु शकतो. तो प्रत्येक परिस्थितीशी चांगलं जुळवून घेतो, जी लोकं त्याच्यावर टीका करतायत त्यांना आपण नेमकं काय बोलतोय हेच समजत नाहीये. त्याचा आतापर्यंतचा अनुभव पाहता भारतीय संघाला धोनीची विश्वचषकासाठी गरज लागणार आहे. याचसोबत विराटला मार्गदर्शन करण्यासाठीही धोनीचं संघात असणं गरजेचं आहे.” India Today वाहिनीशी बोलत असताना शेन वॉर्नने धोनीला आपला पाठींबा दर्शवला.

इंग्लंड आणि भारत हे दोन संघ 2019 चा विश्वचषक जिंकण्यासाठीचे प्रबळ दावेदार असल्याचं शेन वॉर्नने म्हटलं आहे. 30 मे पासून इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

अवश्य वाचा – अजिंक्य रहाणेवर भारतीय संघ अन्याय करतोय – दिलीप वेंगसरकर

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: They have no idea what they are talking about says shane warne on dhonis critics