World Cup 2023 WI vs SCO: वेस्ट इंडिजचा संघ भारतात होणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाच्या मुख्य स्पर्धेत खेळू शकणार नाही. कारण, दोनवेळची वर्ल्डकप चॅम्पियनवर बाहेर पात्रता फेरीतूनच बाहेर पडण्याची वेळ आली आहे. विश्वचषक पात्रता फेरीतील महत्त्वाच्या सामन्यात स्कॉटलंडने विंडीजचा सात गडी राखून पराभव केला. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच वेस्ट इंडिजचा संघ कोणत्याही एकदिवसीय विश्वचषकाचा भाग असणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दोन वेळचा चॅम्पियन वेस्ट इंडिज या वर्षी भारतात होणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. झिम्बाब्वे येथे खेळल्या जात असलेल्या विश्वचषक पात्रता फेरीतील महत्त्वाच्या सामन्यात स्कॉटलंडने वेस्ट इंडिजचा सात विकेट राखून पराभव केला. हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये झालेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजने स्कॉटलंडला १८२ धावांचे लक्ष्य दिले होते, जे त्यांनी ३९ चेंडू राखून पूर्ण केले.

विश्वचषकासाठी पात्रता न मिळणे ही कॅरेबियन क्रिकेटसाठी मोठी लाजीरवाणी गोष्ट आहे. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच वेस्ट इंडिजचा संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणार नाही. यापूर्वी, विंडीजने एकदिवसीय विश्वचषकाच्या सर्व १२ आवृत्त्यांमध्ये भाग घेतला होता. १९७५ आणि १९७९ च्या विश्वचषकात, क्लाइव्ह लॉईडच्या नेतृत्वाखाली विंडीजने विश्वचषक जिंकला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याची वेळ आली. वेस्ट इंडिजचा संघ ४३.५ षटकात केवळ १८१ धावांवर आटोपला. विंडीजकडून, फक्त जेसन होल्डर आणि रोमॅरियो शेफर्ड यांना थोडा संघर्ष करता आला. होल्डरने ७९ चेंडूंत ४५ धावा केल्या, ज्यात तीन चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. त्याचवेळी शेफर्डने ४३ चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने ३६ धावांची खेळी केली. स्कॉटलंडकडून ब्रँडन मॅकमुलेनने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर ख्रिस सोल, मॉक वॅट आणि ख्रिस ग्रीव्हज यांना प्रत्येकी दोन गडी बाद करण्यात यश मिळाले.

हेही वाचा: Naveen-ul-haq: ‘एक होता सिंह, एक होता वाघ आणि…’, कोहलीबरोबर वाद घालणाऱ्या नवीनची इन्स्टाग्राम पोस्ट नेमकी कोणासाठी?

प्रत्युत्तरात स्कॉटलंडने ४३.३ षटकांत लक्ष्य गाठले. यष्टिरक्षक फलंदाज मॅथ्यू क्रॉस ७४ धावा करून नाबाद राहिला. त्याचवेळी ब्रँडन मॅकमुलेनने ६९ धावांची खेळी केली. क्रॉसने आपल्या खेळीत सात चौकार मारले. त्याचवेळी मॅकमुलनने आठ चौकार आणि एक षटकार मारला. माहितीसाठी की, भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत एकूण दहा संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी आठ संघांनी आपले स्थान निश्चित केले होते. त्याच वेळी, इतर दोन संघ सध्या झिम्बाब्वे येथे खेळल्या जात असलेल्या विश्वचषक पात्रता फेरीद्वारे स्पर्धेत प्रवेश करतील. वेस्ट इंडिजने उर्वरित दोन सामने जिंकले तरी त्याला टॉप-२ मध्ये स्थान मिळवता येणार नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two time champions west indies losses against scotland in qualifiers and fails to qualify for wc 2023 avw