Give Bharat ratna To Virat Kohli: भारतीय क्रिकेटच्या इतिहासात केवळ एकाच खेळाडूला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलं गेलं आहे. भारतीय क्रिकेटसाठी बहुमूल्य योगदान देणाऱ्या सचिन तेंडुलकरला २०१४ मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यानंतर कुठल्याही खेळाडूला हा पुरस्कार दिला गेलेला नाही. आता माजी भारतीय क्रिकेटपटूने विराट कोहलीला भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी केली आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात बोलताना म्हटले की, ” विराट कोहलीने जे यश मिळवलं आहे आणि भारतीय क्रिकेटसाठी जे काही केलं आहे ते पाहता त्याला भारतरत्न पुरस्कार मिळायला हवा. भारत सरकारने त्याला भारतरत्न पुरस्कार द्यायला हवा.”

विराट कोहलीने भारतीय क्रिकेटमध्ये मोलाचं योगदान दिलं आहे. २०२४ मध्ये झालेल्या टी –२० वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाने जेतेपदाला गवसणी घातली होती. ही स्पर्धा झाल्यानंतर विराट कोहलीने टी –२० क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. मात्र, दिलासा या गोष्टीचा आनंद होता की टी –२० नाही, तर वनडे आणि कसोटीत विराट खेळताना दिसेल. मात्र आता त्याने कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

येत्या काही दिवसांत भारतीय संघ कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यापूर्वीच विराट कोहलीने कसोटी क्रिकेटला रामराम केला आहे. विराट कोहलीच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने १२३ सामन्यांमध्ये ९२३० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ३० शतकं झळकावली आहेत. विराटकडे कसोटी क्रिकेटमध्ये १०००० धावांचा पल्ला गाठण्याची संधी होती. हा विक्रम करण्यापासून तो अवघ्या ७७० धावा दूर होता. इंग्लंड दौऱ्यावर तो हा विक्रम आपल्या नावावर करू शकला असता. मात्र, त्याआधीच त्याने या प्रारुपातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.

विराट कोहलीसाठी कसोटी क्रिकेटमधील गेली ५ वर्षे खुप वाईट होती. या कालावधीत त्याला केवळ ३ शतकं झळकावता आली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याने पहिल्याच कसोटी शतक पूर्ण केलं. मात्र, त्यानंतर पुढील चारही सामन्यांमध्ये त्याला धावा करता आल्या नव्हत्या. या संपूर्ण मालिकेत त्याला अवघ्या १९० धावा करता आल्या. एक शतकाचा समावेश असून १९० धावा, यावरून दिसतं की विराटच्या फॉर्ममध्ये किती घसरण आली आहे. विराटने टी-२० आणि कसोटी क्रिकेटला रामराम केला आहे मात्र, तो वनडे क्रिकेट खेळणं सुरू ठेवणार आहे.