Ranji Trophy Who is Himanshu Sangwan Clean Bowled Virat Kohli: विराट कोहली १३ वर्षांनी रणजी ट्रॉफीमध्ये दिल्ली संघाकडून खेळण्यासाठी उतरला होता. विराट कोहली दिल्ली वि रेल्वे सामना खेळणार घोषित झाल्यापासून विराट कोहलीला पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. अरूण जेटली स्टेडियमवर तर चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. आपल्या खराब फॉर्मशी झगडत असलेल्या विराट कोहलीला या सामन्यात आश्चर्यकारक काही करता आले नाही आणि तो केवळ ६ धावा करून बाद झाला. या सामन्यात विराट कोहलीला हिमांशू सांगवानने त्रिफळाचीत केलं. पण हा हिमांशू सांगवान आहे तरी कोण, जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि रेल्वेने पहिल्या डावात २४१ धावा केल्या. याला प्रत्युत्तर म्हणून दिल्लीची सुरुवातही फारशी चांगली झाली नाही आणि फलंदाज कोहलीने पहिल्या डावात सर्वांना निराशा केलं. पहिल्या डावात त्याने १५ चेंडूत एका चौकाराच्या मदतीने ६ धावा केल्या आणि हिमांशू सांगवानच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला.

कोण आहे हिमांशू सांगवान? (Who is Himanshu Sangwan?)

२९ वर्षीय हिमांशू सांगवानचा जन्म नजबगड (दिल्ली) येथे झाला आणि तो वीरेंद्र सेहवागचा माजी टीम इंडियाच्या खेळाडूचा शेजारी आहे. सेहवागही नजबगडचा आहे. सांगवान यापूर्वी दिल्लीकडून खेळला होता आणि तो दिल्लीच्या अंडर-१९ संघाचा भाग होता आणि नंतर त्याने रेल्वेकडून खेळण्यास सुरूवात केली.

हिमांशूने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्याने २०१९-२० मध्ये रेल्वेसाठी रणजीत पदार्पण केले. त्याच मोसमात विजय हजारे ट्रॉफीमध्ये लिस्ट ए मध्ये त्याचे पदार्पण झाले. विराट कोहलीची विकेट घेणारा हिमांशू देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी दिल्ली रेल्वे स्टेशनवर तिकीट कलेक्टर म्हणून काम करत होता. हिमांशूने मुंबईविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात आपली छाप पाडली. मुंबई विरुद्धच्या रणजी सामन्यात त्याने ६० धावा देत ६ विकेट घेत चांगलीच खळबळ उडवून दिली होती.

हिमांशूने आतापर्यंत २३ प्रथम श्रेणी सामने खेळले असून ४० डावात ७७ विकेट घेतले आहेत. हिमांशूची फर्स्ट क्लास इनिंगमध्ये ३३ धावांत ६ विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी आहे तर एका सामन्यातील त्याची सर्वोत्तम कामगिरी ८१ धावांत ७ विकेट अशी आहे. हिमांशू उजव्या हाताने फलंदाजी करतो आणि उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is himanshu sangwan he clean bowled virat kohli on ranji trophy return know about him bdg