Mithun Manhas: दिल्लीचे माजी कर्णधार मिथुन मन्हास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआयचे) अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मिथुन मन्हास यांनी दिल्ली संघाचं नेतृत्व केलं आहे. मात्र त्यांना भारतीय संघाकडून एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे बीसीसीआय अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारताच मिथुन मन्हास यांच्याडे इतिहासाला गवसणी घालण्याची संधी असणार आहे. जगातील सर्वात महागडा क्रिकेट बोर्ड असलेल्या बीसीसीआयचं नेतृत्व करणारे ते पहिलेच अन्कॅप्ड भारतीय खेळाडू ठरू शकतात.
येत्या २८ सप्टेंबरला बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. या पदासाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे. २०१९ पासून या पदावर ज्या खेळाडूची निवड झाली आहे, ती बिनविरोध झाली आहे. यावेळीही असच काहीसं होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. क्रिकेटपटूंना या पदासाठी प्राधान्य दिलं जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. याआधी माजी भारतीय खेळाडू रॉजर बिन्नी हे बीसीसीआयचे अध्यक्ष होते. मात्र वयाची ७० वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्यांना हा पदभार सोडावा लागला होता. त्याआधी ही जबाबदारी माजी भारतीय क्रिकेटपटू सौरव गांगुली यांच्याकडे होती. येत्या २८ सप्टेंबरला होणाऱ्या निवडणूकीनंतर बीसीसीआयच्या नव्या अध्यक्षाची घोषणा केली जाणार आहे.
मिथुन मन्हास यांच्याकडे क्रिकेट आणि प्रशासकीय असा दोन्ही गोष्टींचा अनुभव आहे. जम्मूमध्ये जन्मलेल्या मिथुन मन्हास यांनी जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनमध्ये प्रशासकीय भूमिका पार पाडली आहे. यासह बीसीसीआयच्या वार्षिक बैठकीत राज्याचं प्रतिनिधित्व देखील केलं आहे.
दिल्लीला बनवलं रणजी चॅम्पियन
मिथुन मन्हास यांना १९९७-९८ मध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्यावेळी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मणसारखे धाकड फलंदाज भारतीय संघाचा भाग होते. त्यामुळे मिथुन मन्हास यांना भारतीय संघासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही. त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्ली संघाचं नेतृत्व केलं. यादरम्यान त्यांनी दिल्लीला २००७-०८ मध्ये रणजी ट्रॉफी स्पर्धा जिंकून दिली. यादरम्यान त्यांनी फलंदाजीत धावांचा पाऊस पाडत ५७.५६ च्या सरासरीने ९२१ धावा केल्या होत्या.