Tammy Beaumont Run Out Controversy: भारतीय महिला संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये झालेल्या टी-२० मालिकेत भारतीय महिला संघाने इंग्लंडवर दमदार मालिका विजय मिळवला. आता दोन्ही संघांमध्ये वनडे मालिकेचा थरार सुरू आहे. मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्सच्या मैदानावर पार पडला. याआधी जेव्हा दोन्ही संघ या मैदानावर आमनेसामने आले होते. त्यावेळी दीप्ती शर्माने केलेलं मांकडिंग तुफान चर्चेत राहिलं होतं. आता इंग्लंडची सलामीवीर फलंदाज टॅमी ब्युमाँटने असं काही केलं, ज्यावरून नवा वाद पेटला आहे.
या सामन्यात टॅमी ब्युमाँटने फलंदाजी करत असताना ऑब्स्ट्रक्टिंग द फिल्ड (क्षेत्ररक्षण करताना अडथळा निर्माण करणे) करण्याची कृती केली. त्यावेळी भारतीय खेळाडूंनी जोरदार अपील केली. ऑब्स्ट्रक्टिंग द फील्डनुसार खेळाडू फलंदाजाला बाद करण्याची अपील करू शकतात. भारतीय खेळाडू अपील करत राहिले, पण तिसऱ्या पंचांनी तिला नाबाद घोषित केलं.
नेमकं काय घडलं?
तर झाले असे की, इंग्लंडची फलंदाजी सुरू असताना दीप्ती शर्मा गोलंदाजी करत होती. त्यावेळी इंग्लंडची सलामीवीर फलंदाज टॅमी ब्युमाँट स्ट्राईकवर होती. दीप्तीने टाकलेल्या चेंडूवर टॅमी ब्युमाँटने फटका मारला. पण चेंडू जेमिमा रॉड्रिग्जच्या हातात गेला. तिने डाईव्ह मारली आणि चेंडू उचलून वेगाने यष्टीरक्षकाकडे फेकला.
फटका मारल्यानंतर टॅमी धाव घेण्याच्या प्रयत्नात होती. पण जेमिमाने चेंडू अडवला आहे हे पाहताच तिने माघार घेतली. टॅमी आधीच क्रिझमध्ये पोहोचली होती. पण जेमिमाने केलेला थ्रो तिने आपल्या पॅडने अडवण्याचा प्रयत्न केला. हे खेळाच्या नियमाच्या विरोधात आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंनी ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड नियमानुसार जोरदार अपील केली. त्यावेळी पंचांनी हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे पाठवला. तिसऱ्या पंचांनी पाहिलं, त्यावेळी टॅमीचा एक पाय क्रिझच्या आत आणि दुसरा पाय क्रिझच्या बाहेर होता. त्यामुळे तिसऱ्या पंचांनी ती नाबाद असल्याचा निर्णय दिला.
आता नियम काय सांगतो ते जाणून घ्या. ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड या नियमात फलंदाज क्रिझच्या आत आहे की बाहेर हे पाहिलं जात नाही. नियम ३५.१.१ आणि ३७.१.२ नुसार जर एखाद्या फलंदाजाने क्षेत्ररक्षण करत असताना अडथळा निर्माण केला, तर त्याला ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड नियमानुसार बाद घोषित केलं जातं. तर ३७.२ च्या नियमानुसार, जर फलंदाज क्षेत्ररक्षणात अडथळा निर्माण करत असेल किंवा त्यांना विचलित करण्याचा प्रयत्न करत असेल, त्याला बाद घोषित केले जाऊ शकते.