India vs South Africa, Shubman Gill Injury Update: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना ईडन गार्डन्सच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेचा डाव १५९ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाचा डाव १८९ धावांवर आटोपला. यासह पहिल्या डावात भारतीय संघाने ३० धावांची आघाडी घेतली. पण पहिल्या डावात भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार शुबमन गिलला दुखापतीमुळे मैदान सोडावं लागलं होतं. त्यानंतर तो फलंदाजीला येऊ शकलेला नाही. आता बीसीसीआयने त्याच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट दिली आहे.
या सामन्यातील पहिल्या डावात गिल चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. ज्यावेळी गिल फलंदाजीला आला त्यावेळी भारतीय संघाने २ गडी बाद २७५ धावा केल्या होत्या. गिलने दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज सायमन हार्मरने पहिला चेंडू खेळून काढला. त्यानंतर त्याने सायमन हार्मरच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला. त्याने बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने स्वीप शॉट मारून चौकार मारला. पण हा शॉट मारल्यानंतर त्याच्या मानेला दुखापत झाली. त्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं.
बीसीसीआयने दिली अपडेट
वेदना होऊ लागल्याने गिल रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतला. त्यानंतर तो पुन्हा फलंदाजीला येऊ शकला नाही. ९ फलंदाज बाद झाल्यानंतर भारतीय संघाचा डाव संपुष्टात आला. बीसीसीआयने पोस्ट शेअर करत लिहिले की, “शुभमन गिलच्या मानेला दुखापत झाली आहे आणि बीसीसीआयची वैद्यकीय टीम त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. आज तो खेळणार की नाही, याचा निर्णय त्याच्या प्रकृतीत होणाऱ्या प्रगतीच्या आधारावर घेतला जाईल.”
भारतीय संघाचा पहिला डाव
या सामन्यातील पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव १५९ धावांवर आटोपला होता. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाकडून यशस्वी जैस्वालने १२, केएल राहुलने सर्वाधिक ३९, वॉशिंग्टन सुंदरने २९, कर्णधार गिलने ४, ऋषभ पंतने २७, ध्रुव जुरेलने १४ आणि अक्षर पटेलने १६ धावांची खेळी केली. गिलच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची जबाबदारी ऋषभ पंतच्या हाती आहे.
