मुंबई : महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वासाठी शनिवारी मुंबईत क्रिकेटपटूंचा लिलाव होणार आहे. या वेळी एकूण १६५ महिला क्रिकेटपटू लिलावात सहभाग नोंदवणार असून, सर्वाधिक बोली कोणावर लागणार याकडे नजरा लागून राहिल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्रिकेटपटूंच्या लिलावाबरोबरच या वेळी लीग विविध शहरांत खेळवली जाणार की पुन्हा एकदा एकाच केंद्रावर पार पडणार या विषयीचा निर्णयदेखील घेतला जाणार आहे. पहिल्या हंगामात गेल्या वर्षी केवळ मुंबईत ब्रेबॉर्न आणि डी. वाय. पाटील स्टेडियमवर सामने पार पडले होते. या वेळी विविध शहरांत सामने खेळविण्याचा विचार असून, यासाठी प्रामुख्याने मुंबई आणि बंगळूरु या शहरांची नावे चर्चेत आहेत. मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु, गुजरात जायंट्स, यूपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या पाच संघांमध्ये क्रिकेटपटूंसाठी रस्सीखेच चालेल.   या रकमेतून संघांना १८ खेळाडूंची निवड करायची असून, संघात ६ परदेशी खेळाडू अनिवार्य असतील.

हेही वाचा >>> अहमदाबादच्या खेळपट्टीला ‘साधारण’ दर्जा; आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा अहवाल जाहीर

पहिल्या पर्वात भारताची स्मृती मनधाना सर्वाधिक महागडी खेळाडू ठरली होती. बंगळूरुने तेव्हा मुंबई इंडियन्सला टक्कर देत ३.४ कोटी रुपयांची बोली मनधानावर लावली होती. या वेळी नव्या लिलावासाठी वेस्ट इंडिजची डिआंड्रा डॉटिन आणि ऑस्ट्रेलियाची किम गार्थ या खेळाडूंसाठी सर्वाधिक ५० लाख रुपये मूळ  किंमत निश्चित करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेअरहॅम, दक्षिण आफ्रिकेची शबनीम इस्माईल, इंग्लंडची एमी जोन्स यांच्यासाठी ४० लाख रुपये निश्चित करण्यात आले आहेत. भारताकडून वेदा कृष्णमूर्ती, पूनम राऊत, सुषमा वर्मा, एकता बिश्त, गौहर सुलताना, मोना मेश्राम यांच्यासाठी ३० लाख आधारभूत किंमत निश्चित करण्यात आली आहे.

गुजरात जायंट्स करू शकणार सर्वाधिक खर्च

पूर्वीच्या संघातील काही खेळाडूंना मुक्त केल्यानंतर आता विविध संघांकडे नव्या खेळाडूंच्या खरेदीसाठी चांगली रक्कम शिल्लक राहिली आहे. यामध्ये दिल्लीकडे २.२५ कोटी रुपये शिल्लक असून, त्यांना एका परदेशी खेळाडूसह ३ खेळाडूंची जागा भरून काढायची आहे. गुजरातकडे सर्वाधिक ५.९५ कोटी रुपये शिल्लक असून, त्यांना सर्वाधिक १० खेळाडू निश्चित करायचे आहेत. यात तीन परदेशी खेळाडू आहेत. ४ कोटी रुपये यूपी वॉरियर्सकडे शिल्लक असून, त्यांना एका परदेशी खेळाडूसह फक्त पाचच खेळाडू घ्यायचे आहेत. मुंबईकडे २.१० कोटी सर्वात कमी रक्कम शिल्लक असून, त्यांना एका परदेशी खेळाडूसह पाच खेळाडू घ्यायचे आहेत. बंगळूरु संघ ३.३५ कोटी रुपये राखून असून, त्यांना ३ परदेशी खेळाडूंसह सात खेळाडू घ्यायचे आहेत.

लिलावात किती खेळाडू

लिलाव होणाऱ्या १६५ क्रिकेटपटूंमध्ये १०४ भारतीय, तर ६१ परदेशातील महिला क्रिकेटपटू आहेत. यातील १५ क्रिकेटपटू या सहयोगी सदस्य देशांमधील आहेत. या सर्वांमध्ये एकूण ५६ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या, तर १०९ न खेळलेल्या खेळाडू आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wpl auction 2024 auction of 165 cricketers in women s premier league auction zws