PM Modi’s Letter To Cheteshwar Pujara: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा माजी फलंदाज चेतेश्वर पुजाराला पत्र लिहून त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत केलेल्या कामगिरीचे कौतुक केले आहे. पुजाराने गेल्या रविवारी १०३ कसोटी सामन्यांच्या त्याच्या दमदार कारकिर्दीला निरोप दिला. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पत्रात लिहिले आहे की, “हा काळ टी २० आणि एकदिवसीय क्रिकेटच्या वर्चस्वाचा काळ आहे आणि अशा काळात पुजाराच्या फलंदाजीने नेहमीच कसोटी क्रिकेटचे सौंदर्य जिवंत ठेवले. त्याच्या अढळ एकाग्रता आणि संयमाने त्याला भारतीय फलंदाजी एक मजबूत आधारस्तंभ बनवले.”

पुजाराने हे पत्र सोशल मीडियावर शेअर केले आणि पंतप्रधानांच्या प्रेरणादायी शब्दांबद्दल त्यांचे आभार मानले. मोदींनी त्यांच्या संदेशात विशेषतः २०१८ आणि २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या ऐतिहासिक कसोटी मालिका विजयांचा उल्लेख केला. ते म्हणाले की, “कठीण परिस्थितीतही पुजारा टीम इंडियाला भक्कमपणे उभा राहिला आणि आणि सर्वात आक्रमक गोलंदाजांविरोधात खंबीरपणे उभा राहिला.”

पंतप्रधानांनी असेही लिहिले की, ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांची चाहते नेहमीच आठवण ठेवतील, जिथे पुजाराने आपल्या आक्रमक फलंदाजीने भारताच्या ऐतिहासिक विजयाचा पाया रचला. मोदींनी पुजाराच्या देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीचेही कौतुक केले. ते म्हणाले की, “आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असूनही, पुजाराने नेहमीच सौराष्ट्र आणि परदेशी लीगमध्ये प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणे पसंत केले. यावरून खेळाप्रती त्याची आवड आणि वचनबद्धता दिसून येते.”

पंतप्रधान पुढे म्हणाले, “सौराष्ट्र क्रिकेटशी तुझा दीर्घकाळचा संबंध आणि राजकोटला क्रिकेटच्या नकाशावर आणण्यात तुझे योगदान या भागातील प्रत्येक तरुणासाठी अभिमानाचा विषय असेल.”

पंतप्रधानांच्या या पत्राला उत्तर देताना पुजाराने म्हटले आहे की, “माझ्या निवृत्तीबद्दल आपल्या माननीय पंतप्रधानांकडून कौतुकाचे पत्र मिळाल्याने मला सन्मान वाटतो. तुमच्या भावनांची मी खूप कदर करतो. माझ्या दुसऱ्या इनिंगमध्ये पाऊल ठेवताना, मैदानावर घालवलेल्या प्रत्येक आठवणी आणि मला मिळालेले प्रेम आणि कौतुक मी जपून ठेवेन. धन्यवाद सर.”