टीम इंडियाचा तरुण तडफदार धडाकेबाज सलामीवीर यशस्वी जैस्वालने मुंबई संघाला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी डोमेस्टिक हंगामात यशस्वी गोव्याकडून खेळताना दिसणार आहे. यशस्वीने यासंदर्भात मुंबई क्रिकेट असोसिएशनला इमेल लिहिला. यशस्वीच्या निर्णयाने एमसीएचे पदाधिकारी आश्चर्यचकित झाले पण त्यांनी त्याला ना हरकत प्रमाणपत्र जारी केले आहे. यामुळे यशस्वीचा गोव्यासाठी खेळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. डोमेस्टिक क्रिकेटमधल्या चॅम्पियन संघाऐवजी गोव्याकडून खेळण्याचं कारण यशस्वीने अद्याप स्पष्ट केलेलं नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्रिकइन्फो संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार गोवा क्रिकेट असोसिएशनचे सचिव शंभू देसाई यांनी यशस्वीशी चर्चा केली. टेस्ट, वनडे आणि ट्वेन्टी२० अशा तिन्ही प्रकारात यशस्वीने धावांची टांकसाळ उघडली आहे. आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्सने त्याला १८ कोटी रुपये खर्चून रिटेन केलं आहे. आम्ही एक चांगला संघ उभारू इच्छितो. देशातील सर्वोत्तम प्रतिभाशाली खेळाडू गोव्याकडून खेळावेत असा आमचा प्रयत्न आहे. या विचारातूनच आम्ही यशस्वीशी संवाद साधला असं देसाई म्हणाले.

डोमेस्टिक क्रिकेटमध्ये यशस्वीने ३६ प्रथम श्रेणी सामन्यात मुंबईचं प्रतिनिधित्व केलं आहे. ६०.८५च्या सरासरीने त्याने ३७१२ धावा केल्या आहेत. २०१९ मध्ये त्याने मुंबईसाठी पदार्पण केलं होतं. उत्तर प्रदेशातल्या भदोही इथून मुंबईला येऊन आझाद मैदानाजवळच्या तंबूत राहून यशस्वीने क्रिकेटची आवड जोपासली होती. फावल्या वेळात पाणीपुरीच्या गाडीवरही त्याने काम केलं होतं. परिस्थितीशी संघर्ष करत यशस्वीने दमदार वाटचाल केली आहे. मुंबईतल्या मैदानांवर यशस्वीची बॅट सातत्याने तळपते आहे. २०२० मध्ये झालेल्या U19 वर्ल्डकप स्पर्धेत यशस्वी मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला होता.

२०२१-११ या पहिल्यावहिल्या रणजी हंगामात यशस्वीने मुंबईसाठी तीन शतकं झळकावली. मुंबईसाठी खेळताना लिस्ट ए सामन्यात त्याने ३३ सामन्यात १५२६ धावा केल्या आहेत. यशस्वीने १९ टेस्ट, एकमेव वनडे आणि २३ ट्वेन्टी२० सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young batting sensation left handed opener yashasvi jaiswal to move from mumbai for 2025 26 domestic season psp