Early Signs of Cardiac Arrest: ‘कांटा लगा’ या गाण्यामुळे प्रचंड लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे वयाच्या ४२ व्या वर्षी अचानक निधन झाले आहे. रिपोर्टनुसार, शेफालीला कार्डियाक अरेस्ट आला, त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शेफालीच्या मृत्यूच्या बातमीने चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. पण, या घटनेमुळे एक गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अचानक होणाऱ्या कार्डियाक अरेस्टचे संकेत काय असतात आणि यापासून बचाव कसा करावा? राजीव गांधी रुग्णालयाचे वरिष्ठ हृदयविकारतज्ज्ञ डॉ. अजित कुमार यांनी सांगितले की, आजच्या काळात तरुणांमध्येही हृदयविकाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे आणि त्यामागचं मुख्य कारण म्हणजे चुकीची जीवनशैली आणि तणावपूर्ण दिनचर्या असल्याचे ते सांगतात.

हृदयविकाराचा झटका (Heart Attack) हा आजच्या काळात वाढत्या मृत्यूंचं एक प्रमुख कारण ठरत आहे. अनेकदा हार्ट अटॅक, कार्डियाक अरेस्ट किंवा इतर हृदयविकारांच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे रुग्णाला वेळेत मदत मिळत नाही, परिणामी अचानक मृत्यू ओढवतो. विशेषतः तरुण वयोगटात वाढती कामाची धावपळ, ताणतणाव, चुकीची जीवनशैली आणि अयोग्य आहार यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचे प्रमाण वेगाने वाढत आहे.

ज्यावेळी शरीर हृदयाच्या त्रासाचे स्पष्ट संकेत देत असतं, तेव्हा बऱ्याचदा लोक ते गंभीरपणे घेत नाहीत किंवा लक्षणांची ओळख पटत नाही आणि हीच वेळ संकट डोक्यावर आणते. त्यामुळे हृदयविकाराच्या सुरुवातीच्या लक्षणांची माहिती असणे, योग्य वेळी उपचार घेणे आणि प्रतिबंधात्मक उपाय करणे हे आजच्या घडीला अत्यावश्यक ठरतंय. अलीकडे कमी वयातच लोकांना कार्डियाक अरेस्ट येण्याचा धोका वाढला आहे. कार्डियाक अरेस्टच्या लक्षणांना लोक सामान्य समजून त्याकडे दुर्लक्ष करतात, जे घातक ठरू शकतं. कार्डियाक अरेस्ट काय आहे? कार्डियाक अरेस्टचे संकेत काय आहेत? डॉक्टरांकडून समजून घ्या…

कार्डियाक अरेस्ट म्हणजे काय?

कार्डियाक अरेस्टचा अर्थ हृदयाची क्रिया अचानक बंद पडणं आणि शरीरात रक्तप्रवाह थांबणे. श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो आणि बेशुद्ध झाल्यासारखं वाटू लागतं. ही एक अतिशय गंभीर आणि जीवघेणी स्थिती असते. कार्डियाक अरेस्टमध्ये हृदयाचा रक्तपुरवठा पूर्णत: बंद होतो. हृदयात वेंट्रिकूलर फायब्रिलेशन निर्माण झाल्याने त्याचा परिणाम हृदयाच्या ठोक्यांवर होतो, त्यामुळे कार्डियाक अरेस्टमध्ये काही मिनिटातंच मृत्यू होऊ शकतो.

कार्डियाक अरेस्टचे धोकादायक संकेत

  • अचानक बेशुद्ध होणं किंवा कोसळणं : मेंदूपर्यंत ऑक्सिजन पोहोचत नाही, त्यामुळे हे लक्षण दिसते.
  • नाडी थांबणे : हृदयाचं ठोके घेणं बंद पडतं आणि रक्तप्रवाह थांबतो.
  • श्वास घेणं बंद होणं : हे अतिशय गंभीर लक्षण आहे.
  • छातीत अचानक वेदना, दडपण, घुसमट : हे कार्डियाक अरेस्टच्या अगोदरचे महत्त्वाचे संकेत असू शकतात.
  • हृदयाच्या ठोक्यांचा अनियमितपणा किंवा धडधड वाढणं : जे हृदयाच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतं.

बचाव कसा कराल?

नियमित चालणं, योगासने, संतुलित आहार, तणावमुक्त जीवनशैली आणि धूम्रपान/दारू टाळणं, हे सर्व उपाय हृदयविकाराच्या धोक्यापासून दूर ठेवू शकतात. शेफालीच्या जाण्यानं एका टॅलेंटेड कलाकाराचं अकाली निधन झालं आहे, पण त्याचबरोबर हृदयविकारासारख्या गंभीर आजाराविषयी जनजागृती होणंही तितकंच आवश्यक आहे.