Roti On Gas Flame Cancer: भारतीय जेवण म्हटलं की, चपाती-पोळी, भाकरी हाच आपल्या थाळीचा अविभाज्य भाग. बहुतेक घरात आजही पोळी अर्धवट तव्यावर, मग थेट गॅसच्या ज्वालेवर भाजून फुगवली जाते. पण, नेमका हाच प्रकार आरोग्यासाठी धोकादायक ठरतोय का? कॅन्सरशी त्याचा काही संबंध आहे का? चला पाहूया शास्त्रज्ञ आणि डॉक्टर्स काय सांगतात…
घराघरात रोज घडणारी चपाती थेट गॅसवर फुगवण्याची ही साधी कृती… पण या क्षुल्लक वाटणाऱ्या सवयीच्या मागे दडलेलं आहे असं एक रहस्य, जे ऐकल्यावर कोणीही विचारात पडेल. तव्यावर भाजायचं की गॅसच्या बर्नरवर थेट फुगवायचं? हा वाद कायमचाच… पण, थेट गॅसवर भाजलेली चपाती खाल्ल्यावर शरीरात काय घडतं, ते जाणून घेतल्यावर तुम्ही थक्क व्हाल.
वैज्ञानिक अभ्यास काय सांगतो?
२०१५ मध्ये Environmental Science and Technology या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, नैसर्गिक गॅस स्टोव्हमधून कार्बन मोनो-ऑक्साइड, नायट्रोजन डाय-ऑक्साइड आणि सूक्ष्म कण बाहेर पडतात. हे WHO च्या मापदंडांनुसार धोकादायक मानले जातात आणि दीर्घकाळ श्वास घेतल्यास श्वसनाचे आजार, हृदयविकार व कॅन्सर यांसारख्या समस्यांना कारणीभूत ठरू शकतात. त्याशिवाय उच्च तापमानावर शिजवलेल्या पदार्थांमध्ये हेट्रोसायक्लिक अमाइन्स (HCAs) आणि पॉलीसायक्लिक अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स (PAHs) तयार होतात. हे घटक DNA ला हानी पोहोचवून कॅन्सरचे संभाव्य कारण ठरू शकतात.
डॉक्टर काय म्हणतात?
दिल्लीतील वरिष्ठ ऑन्कोलॉजिस्ट डॉ. श्याम अग्रवाल म्हणतात, “फक्त थेट गॅसच्या बर्नरवर चपाती शिजवल्याने कॅन्सर होतो, असं सरळ सांगता येत नाही. शरीरात अशा DNA हानीची दुरुस्ती करण्याची नैसर्गिक क्षमता असते. मात्र, जर दीर्घकाळ अशा प्रकारे शिजविलेले पदार्थ नियमित खाल्ले, तर धोका वाढतो.”
अपोलो हॉस्पिटल्सचे डॉ. दीपांजन पांडा यांच्या मते, “जास्त पुरावे नसले तरी थेट ज्वालेवर किंवा कोळशावर शिजविताना हानिकारक रसायनं तयार होतात. चुलीवर शिजवलेल्या पदार्थांचा आणि गॉलब्लॅडर कॅन्सर (पित्ताशयात होणारी कर्करोगाची असामान्य वाढ)चा काहीसा संबंध आढळला आहे. त्यामुळे शक्य असेल, तर टाळावं.”
तवा की थेट गॅस?
पूर्वी लोक चपाती तव्यावर कपड्याने दाबून पूर्ण शिजवायचे. त्यामुळे चपाती समतोल शिजत असे आणि थेट ज्वालेचा संपर्क टळत असे. आज मात्र वेळ वाचवण्यासाठी बहुतांश घरात पोळी थेट गॅसवर फुगवली जाते. त्यामुळे कधी कधी चपातीचा काही भाग करपतो, काळा होतो आणि त्यात धोकादायक Acrylamide रसायन तयार होऊ शकतं. Acrylamide हे एक रसायन आहे, जे शिजवण्याच्या प्रक्रियेदरम्यान नैसर्गिकरीत्या तयार होते. अॅक्रिलामाइडमुळे मानवांमध्ये कर्करोग होऊ शकतो, असे मानले जाते.
फक्त चपातीच नाही तर…
संशोधन सांगतं की मांस, मासे किंवा बटाट्यासारखे स्टार्चयुक्त पदार्थ जेव्हा थेट आगीवर किंवा जास्त तापमानावर शिजवले जातात, तेव्हाही हेच कॅन्सरकारक घटक तयार होतात.
थेट गॅसवर चपाती शिजवल्याने कॅन्सर होतो याचे ठोस पुरावे अजून नाहीत. पण, वारंवार जळलेली किंवा करपलेली पोळी खाल्ल्यास धोका नक्कीच वाढतो. त्यामुळे सावधगिरी म्हणून तव्यावर हळूहळू शिजवलेली चपाती खाणं जास्त सुरक्षित ठरेल.